ताणतणावापासून दूर राहण्यासाठी छंद जोपासणे आवश्यक

डॉ. सोमनाथ साबळे; ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘हरी ओम ग्रुप’च्यावतीने व्याख्यान


सातारा ः ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. सोमनाथ साबळे. व्यासपीठावर रवींद्र भारती-झुटींग, शहाजी माने, यशवंत घोरपडे आदी.

स्थैर्य, सातारा, दि. 6 ऑक्टोबर : गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वच आर्थिक-सामाजिक स्तरांमधील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येतात. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढलेले दिसत आहेत. तणावाला तुम्ही कोणत्या प्रकारे सामोरे जाता यावरही हृदयाचं आरोग्य कसं राहील हे अवलंबून असतं. ताणतणाव वाढले तर हृदयविकार होण्याची आणि झटका येण्याची शक्यता वाढते, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गुरुवार बागेत हरी ओम ग्रुपच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक रविंद्र भारती- झुटिंग, हरी ओम ग्रुपचे अध्यक्ष शहाजी माने, उपाध्यक्ष यशवंत घोरपडे उपस्थित होते.

डॉ. सोमनाथ साबळे म्हणाले, या जीवनशैलीविषयक आजारांमध्ये अनेक मानसिक आजार आणि मानसिक अवस्थांचाही समावेश आहे. काही वर्षांपासून जीवनशैलीविषयक आजारांत मोठी वाढ झालेली आहे. हृदयरोगाचं प्रमाण एकेकाळी 50 ते 60 वयोगटापलिकडच्या लोकांमध्ये असे मात्र आता ते हळूहळू खाली येत तरुणांमध्येही हृदयरोगाच्या धक्क्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. हृदयरोगाच्या या संकटाला वेळीच ओळखून 30-40 वयोगटातील लोकांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबात जर जनुकीय आजार असतील तर ते माहिती पाहिजेत. तसेच दारू-सिगारेट सोडणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने नियमित व्यायाम म्हणजे किमान 45 मिनिटं चालणं आवश्यक आहे. संतुलित आहार आणि दरवर्षी आरोग्याची तपासणी करणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण टाळला पाहिजे. जर आहार आणि जीवनशैलीतील बदल आजपासूनच केले तर हृदयरोगाच्या संभाव्य शक्यतेला दहा ते पंधरा वर्षं पुढं ढकललं जाऊ शकतं. काही लोकांच्या बाबतीत तो पूर्णतः टाळलाही जाऊ शकतो. महिलांनीही एक चांगली जीवनशैली आत्मसात करावी आणि वेळेत चाचण्या कराव्यात, असे आवाहन डॉ. साबळे यांनी केले. यावेळी विविध ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींचा सत्कार डॉ. सोमनाथ साबळे यांचे हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास दिलीप इमानदार, श्री. शेवते, रमेश ठोंबरे, सुभाष नवले, सुरेखा मोरे, विद्याताई आगाशे, शाम माळी, मदन देवी, मनीष मुनोत, चंदूशेठ जाधव, राजेंद्र जगताप, धनंजय देवी, आदी उपस्थित होते. यशवंत घोरपडे यांनी स्वागत केले. रविंद्र भारती- झुटिंग यांनी प्रास्ताविक केले. शहाजी माने यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!