दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येईल. तसेच सर्व खासगी आस्थापनाना त्यांची मनुष्यबळ मागणी राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग व कामगार विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत पुढील कर्यवाही केली जाईल, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.
शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळण्याबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी माहिती देताना श्री. लोढा बोलत होते.
कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले, रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत कंपनीने रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक राहील. यासाठी विभागाच्यावतीने पोर्टल विकसित करण्यात आले असून या पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांची नोंदणी वाढली पाहिजे, तसेच या विभागाच्या वतीने बेरोजगार उमेदवारांना नोकरी तसेच चांगल्या सुविधा कशा प्रकारे देता येतील यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सचिन अहिर, प्रवीण दरेकर, डॉ. रणजित पाटील, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.