
कांबळेश्वर – येथील भिवाई देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात बोलताना प्रा. रवींद्र कोकरे
स्थैर्य, फलटण, दि. 9 नोव्हेंबर : दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे. कोणतेही धार्मिक कार्य करताना त्यामागचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. माणूस वाचनातून घडतो त्यासाठी शिकून उपयोग नाही तर ते आपल्या कृतीत दिसलं पाहिजे. पुस्तके मस्तक घडवतात. दीपदान म्हणजे सामुहिक पुस्तक वाचनाचा जागर हीच त्रिपुरारी पौर्णिमा होय असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.
कांबळेश्वर येथील भिवाई देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव व वाचनालय शुभारंभ प्रसंगीत ते बोलत होते. करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने पारंपारिक पद्धतीने दीपोत्सव, देवदीपावली, रोषणाई, सामुहिक वाचन, मंदीर साफसफाई, स्वच्छता, भव्य दिव्य रांगोळी, पारंपारिक वाद्यांचा गजर, दीपमाळा प्रज्वलीत करून आदी कार्यक्रमांद्वारे त्रिपुरारी पौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भिवाईदेवी वाचनालयाचा शुभारंभ प्रा. रवींद्र कोकरे यांचे हस्ते करण्यात आला. श्री. रविंद्र कोकरे यांनी पन्नास दर्जेदार पुस्तके भेट दिली. प्रा. कोकरे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महिला वर्ग, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

