दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । सातारा । इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा होणे यास माझ्या दृष्टीने महत्त्व आहे कारण कोणतीही दुसरी भाषा ही त्या भाषेची शत्रू नसते माणसं ती बनवतात. त्यामुळे भाषा भगिनी हे साने गुरुजींचे स्वप्न प्रत्यक्षात आचरणात आणण्याचे काम येथे होत आहे हे महत्त्वाचेच आहे असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व जेष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी सातारा येथे बोलताना केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा आणि यशोदा शिक्षण संस्थेचे साधना इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय मांडके बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य वैशाली धुमाळे होत्या. प्रमुख उपस्थिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत कांबिरे यांची होती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम.जे धोटे व सचिव वरिष्ठ न्यायालय दिवाणी न्यायाधीश तृप्ती नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विजय मांडके यांनी मराठी भाषे विषयी बोलताना बोली भाषा , प्रमाणभाषा , मातृभाषा यासंदर्भात विस्तृत माहिती दिली आणि परकीय भाषा शिकल्या पाहिजेत मात्र त्यासाठी मातृभाषा विसरू नये. मराठी भाषा टिकली तरच समाज टिकेल व पुढची पिढी टिकेल. मराठी भाषा जतन करण्यापेक्षा ती समृद्ध केली पाहिजे यासाठी अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबवणे हेच महत्त्वाचे आहे असे म्हटले. यावेळी विद्यालयातील २०२१ सालचा बेस्ट स्टुडंट ऑफ द इअर पुरस्कार प्राप्त विद्यार्थी विरधवल यादव आणि विज्ञान क्षेत्रातील संशोधन कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल विशाल मोरे या विद्यार्थ्याचा सत्कार विजय मांडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव करणारी गीते , शाहिरी , व्याख्याने सादर केले आणि अभिव्यक्ती द्वारे मराठी भाषेचे गुणगान गायले. प्राचार्य वैशाली धुमाळे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यालयात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली व हा कार्यक्रम विधी सेवा प्राधिकरणाने विद्यालयात साजरा केला याबद्दल धन्यवाद दिले. आभार मानताना चंद्रकांत कांबिरे यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली. प्रास्ताविक सौ. पुनम मिसाळ यांनी केले. सुत्रसंचलन पुनम वैराट यांनी मानले.