“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । मुंबई । आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते. यातच आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास कोणाच्या बाजूने जनमत असेल, याबाबतचे सर्व्हे आले आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुलाची जागा वाचवण्याचे आव्हान दिले आहे.

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात तेव्हा त्यांना हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्व्हे भाजपच्या बाजूने आहे, तो त्यांना हवाय. पण महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्या विरोधातील आहे. तो त्यांना नकोय. त्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला साधारण ३४ जागा मिळतील असा अंदाज आहे. पण आम्ही म्हणतो या जागा ४० ते ४५ असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा सर्व्हे फेटाळून लावला आहे. महाविकास आघाडीच्या चार-पाच जागा निवडून आल्या तरी पुरे, असे म्हटले होते. यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिले.

तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे

मुख्यमंत्री म्हणाले, ४ ते ५ जागा मिळवल्या तरी पुरे. माझे म्हणणे आहे. त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा वाचवली तरी पुरे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. दुसरीकडे, वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत जाण्याबाबतचा प्रस्ताव आला नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांचे म्हणणे खरे आहे. अजूनही महाविकास आघाडी म्हणून वंचित बरोबर युती झाली नाही. चर्चा फक्त वंचित आणि शिवसेनेसोबतच झाली आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत

जनमच चाचणीबाबत शरद पवार म्हणाले की, बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांच्यासोबत राहणार नाही, असे चित्र या सर्व्हेतून दिसत आहे. तो सर्वे मी वाचला. आता जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याविरोधात देशात जनमत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहील असे वाटत नाही. यापूर्वीचे सर्व्हे पाहिले. पाच ते दहा वर्षापूर्वीचे याच एजन्सीने केलेले सर्व्हेही पाहिले तर या एजन्सीचे आकडे खरे ठरले आहेत. या एजन्सीने एकप्रकारे ही दिशा दाखवली आहे. ही दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीचे आहे असे वाटत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!