नावं कमविणे ह्यापेक्षा नावं ठेवणे सोप्पं की अवघड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


कौतुक बऱ्याचदा लांबच्यांकडूनच होतं, जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जातो.नावं दगडावर कोरावं की काळजावरं तेव्हा ते टिकेल.टीकेला भीक न घालता आपण आपले कार्य केल्यास नावं कोरुन ठेवण्याची गरजच नाही.रहाता राहिला प्रश्न कौतुक व शंका घेणाऱ्याचे काय करायचे.ते जर रतिब लावणाऱ्यागत आपल्यावर लक्ष ठेऊन त्यांचा कामधंदा बाजूला ठेऊन कार्य करीत असतील तर त्यांच नावंच का घ्यावं?येतयना ध्यानात.

कौतुक करणारे दूरचे असतात.दूरुन डोंगार साजरे.त्यांना आपल्यातील चांगुलपणा,गोडवा,मितभाषीपणा आपलेसा वाटतो.कारण त्यांचा अन् आपला दूरन्वये अप्रत्यक्षपणे काही कालावधीचा सहयोग असतो.त्यात आपणही चांगले देण्याचा वा वागण्याचा प्रयत्न करतो.त्यामुळे क्षणिक सहवास कौतुकास पात्रच रहातो.देखल्या देवा दंडवत त्याप्रमाणे दूरच्या लोकांच कौतुक मनावर घ्यावं.लै हुरुळून वा भुलून न जाता आपले कार्य करावे.

जवळाच्या लोकांना कडून कौतुक न होता शंका , टीका, निंदानालस्ती ,तुझं माझं ,भांडण तंटा, अपमान ,हेवेदावे ,पाण्यात पाहणे, कमी लेखणे याचाच वर्षाव होतो.आपण त्यात चिंब भिजून मनसोक्त आनंद घ्यावा.भिजून झाले की लगेच त्यातून बाहेर पडून लख्ख ऊनाची प्रतिक्षा करुन नेटाने कार्यरत रहावे.

जवळचे आपणांवर दिनरात्र न्याहाळीत व पाळतीवर असतात.त्यांना तुमचा चांगुलपणा, सामाजिक धडपड , मेहनत नजरेत खुपते.आपल्या मागचा अन् सा-याच्या म्होरचा हेच सहन होत नाही.तुमच्या प्रगतीला भावकी अन् चांगल्या रस्त्याला गतीरोधक त्यामुळेच असतात.

अहो बारश्याला महिला बाळाच नावं ठेवायला जातात की नावं ठेवायला हा संशोधनाचा भाग आहे.बसल्या बसल्या हळूच फुणगी टाकून मोकळ्या.भडका झाला की लगेच शेकायला तयार.सर्वच महिला अश्या असतात असे नव्हे.आपण पुरुष सुद्धा नावं ठेवण्यात पटाईतच .बसल्या बसल्या अंगठ्याने माती उकरीत पुढच्याच्या डोक्याचा भुगा करुन मोकळे.आपल्या जवळ दुसऱ्याच साताबारा काढून मोळका अन् त्याच्या जवळ गेला की आपला उतारा त्यांच्या जवळ.हेच जवळच्या लोकांचे काम अव्याहतपणे सुरु असते.

नावं ठेवणे सोप्प की नावं कमाविणे अवघड हे ज्याच त्यान ठरवावे.मला तर वाटते कुणी निंदू वा वंदू आपण कुणालाच नावे न ठेवता मार्गस्थ रहावे.

आपलाच नामक ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!