लवकरच रणजितदादांवर विशेष जबाबदारी ?; भाजपा पक्षश्रेष्ठी कामकाजावर खुश !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2025 | फलटण | रणजितदादा यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ताकद देण्याचे कामकाज सुरु आहे. राज्यामध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना “वाय प्लस एस्कॉर्ट”सह सुरक्षा देण्यात आली आहे. राज्यातील अति महत्वाच्या व्यक्तींना “वाय प्लस एस्कॉर्ट”सह पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. राज्यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आलेली हि सुरक्षा म्हणजे आगामी काळामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठी जबाबदारी देण्याचे संकेत असल्याचे मत सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

… तर फलटण तालुक्यात दोन लाल दिवे दिसले असते !

लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण येथील राजे गटाने जर पुढाकार न घेता महायुतीचे कामकाज केले असते तर आज फलटण तालुक्याला दोन लाल दिवे आले असते. यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रात मंत्री झाले असते व राज्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा विधानपरिषदेच्या सभापती पदी विराजमान झाले असते. परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी राजे गटाच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघामधील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सर्व विरोधकांना एकत्रित करत त्यांचा पराभव करण्यासाठी विशेष रणनीती आखली असल्याचे दिसून आले होते. त्यासाठी संपूर्ण मतदारसंघात व अगदी पुणे, मुंबईमध्ये सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी बैठका घेतल्या होत्या व त्यावेळी ते यशस्वी सुद्धा झाले व त्यामध्ये फलटणचे सुपुत्र असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघात पराभव झाला.

लोकसभेच्या पराभवाच्यानंतर विधानसभा रणजितदादांनी मारली !

रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पराभवाला खचून न जाता निकालाच्या दुसऱ्या दिवशी पासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दौरे सुरु केले. आणि त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढवण्याचे संकेत रणजितसिंह यांनी दिले होते. त्याप्रमाणेच त्यांनी त्यांचे शिलेदार असलेले सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तिकीट घेत विधानसभा लढवली व जिंकली सुद्धा त्यामुळे फलटण तालुक्यात एका नवीन अध्यायाला सुरवात झाली आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाल्यापासून त्यांनी फलटण शहर व तालुक्यासाठी विशेष प्रयत्न करत वाढीव निधी कायमच मंजूर करून आणला होता. त्याचेच फळ त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळाले होते त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांना त्याची प्रचिती येत विधानसभेला राजे गटाचा पराभव करत सचिन पाटील यांना विधानसभेवर निवडून आणले. यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विकासाचे राजकारण करत गेले त्यामुळे त्यांच्यासोबत राजे गटाच्या सोबत निष्ठावंत म्हणून काम करणारे सुद्धा जोडले गेले आहेत.

राजे गटाचे बुरुज रणजितदादांनी पाडले !

यामध्ये प्रामुख्याने जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांची मोलाची साथ हि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाली होती. त्याचाच प्रत्यय म्हणून सचिन पाटील यांना विधानसभेला भरघोस असे मतदान सुद्धा मिळाले आहे. यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, विलासराव नलवडे, युवा उद्योजक अमित भोईटे, रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पोकळे, अनिल जगताप, माजी नगरसेवक फिरोज आतार, अजय माळवे, सुधीर अहिवळे, आबा खलाटे, युवा नेते मनोज गावडे यांनी राजे गट सोडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने राजे गटाचा बुरुज ढासळत चालला असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

यासोबतच राजे गटातील अनेक निष्ठावंत नेते, कार्यकर्ते हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्कात आहेत. आगामी काही दिवसात राजे गटाला नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पॅनल टाकताना मोठी कसरत होणार असल्याचे चित्र सध्या तयार झाले आहे. यासोबतच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा ज्याला आशीर्वाद मिळेल तो सहजरित्या स्थानिक स्वराज्य संस्थवर निवडून जाऊ शकतो; असे चित्र तयार झाले आहे.

सोलापुरच्या पालकमंत्रीपदी ना. गोरेंची वर्णी लागण्यासाठी रणजितदादांचे विशेष प्रयत्न !

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात मोठे वजन आलस्याचे नेहमीच दिसून आले आहे. म्हणजे अगदी जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा होता त्यासोबतच त्यांना राज्यातील महत्वाचे खाते असणाऱ्या ग्रामविकास खाते मिळण्यासाठी सुद्धा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी जयकुमार गोरे यांची वर्णी लागण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विदेश प्रयत्न केले असल्याचे बोलले जात आहे.

जयकुमार गोरे व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मैत्री सर्वश्रुत आहे. म्हणजे अगदी स्वतः जयकुमार गोरे नेहमीच म्हणतात कि जयकुमार गोरे व रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. अगदी जयकुमार गोरे यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताना सुद्धा त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्यासोबत घेतच मंत्री पदाचा पदभार स्वीकारला होता. जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होण्यामध्ये रणजितदादांचा मोठा वाटा आहे. आता यापुढे रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच सोलापूर जिल्ह्याचे किंबहुना माढा लोकसभा मतदारसंघाचे पालकमंत्री झाले असल्याचे मत राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!