दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘दीपक चव्हाण आमदार व्हावेत ही अजित पवारांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी फोनद्वारे महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी दीपक चव्हाणांचीच जाहीर केली होती’’, असे विधान फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडी (ता.फलटण) येथे आयोजित जाहीर सभेत श्रीमंत विश्वजीतराजे बोलत होते. व्यासपीठावर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महेंद्र सूर्यवंशी बेडके, सह्याद्री कदम, नितीन भोसले, भगवानराव होळकर, शंकरराव माडकर, राजाभाऊ भोसले, सतीश माने, सौ. रेश्माताई भोसले, शंभुराज खलाटे, सुधीर भोसले, विकास नाळे आदींची उपस्थिती होती.
श्रीमंत विश्वजीतराजे पुढे म्हणाले, ‘‘दोन दिवसांपूर्वी साखरवाडीत झालेल्या त्यांच्या सभेत व्यासपीठावर आपल्याकडून तिकडे गेलेले लाचार लाभार्थी बसलेले होते. वनवासाची भाषा करणारे इथले माजी सरपंच कमिन्सचं स्क्रॅप उचलत होते तेव्हा त्यांना वनवास नव्हता का ? इथल्या साखर कारखान्याचं प्रल्हादतात्यांनी दबडं केले; शेतकर्यांना सोडून निघून गेले, ते म्हणतायत की त्यांचा कारखाना आम्ही काढून घेतला. खरंतर श्रीमंत रामराजे यांनी पानटपरीसारखा झालेला इथला कारखाना सुस्थितीत आणला आहे. त्यामुळे शेतकर्यांना त्यांची ऊस बिले, कामगारांना थकीत वेतन मिळत आहेत. त्यादिवशी अजितदादांनी जरी कामगारांना मतदानाचा आदेश दिला असला तरी कामगारांना श्रीमंत रामराजेंनी केलेल्या कामाची जाण आहे. या तालुक्यात आदेश देऊन काही मिळत नाही विनंती केली तर मिळतं हे अजितदांदांना ठाऊक नाही’’, असेही श्रीमंत विश्वजीतराजे म्हणाले.
‘‘ गेल्या 15 वर्षाच्या कालखंडात श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्त्वाखाली आमदार दीपक चव्हाणांनी केलेले काम सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मतदारांनी डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास टाकावा. स्वाभिमान गहाण ठेवून जगायचं नाही हे लक्षात ठेवून तुमच्या अडचणी कोण सोडवतं, रक्ताचं पाणी करुन आजवर तालुक्यासाठी कोणी योगदान दिलंय याचा विचार करा आणि सलग चौथ्यांदा आमदार दीपक चव्हाण यांना निवडून द्या’’, असेही आवाहन यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे यांनी मतदारांना केले.