सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२२ । नागपूर । विधिमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला समर्पक राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालतो. आपली लोकशाही जगात आदर्शवत मानली जाते. देशातील अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक आहे, तसेच आपल्या लोकशाहीचे हे खूप सुंदर रुप आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्र व लोकप्रशासन विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयावर आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राष्ट्रकुल संसदीय मंडळाची परंपरा आणि त्यांचा इतिहास मोठा आहे. या मंडळामार्फत राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभ्यासवर्गाचा उपक्रम चांगला आहे. या अभ्यासक्रमात सहभागी झालेले अनेक विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर विराजमान झाले. या अभ्यासवर्गाचे विद्यार्थी राहिलेले विधीमंडळ सदस्य दिलीप वळसे- पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळविले. आता या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करुन भविष्यात विविध क्षेत्रात यश मिळवावे, यासाठी हा अभ्यासवर्ग निश्चितच उपयोगी ठरेल. संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने असे अभ्यासवर्ग निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, विधिमंडळ हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. विधिमंडळात विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते. विधीमंडळातील कायदे हे सर्वसामान्यांच्या हिताचे असतात. आपल्या लोकशाहीने सर्वसामान्यांचे हित समोर ठेवून केलेली संसदीय रचना ही जगात आदर्शवत आहे.

मेस्सीसारखे खेळाडू एका दिवसात घडत नाहीत

नुकत्याच झालेल्या फुटबॉल विश्वचषक सामन्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अर्जेंटिना देश फुटबॉल विश्वचषकामध्ये जगज्जेता ठरला. या संघाच्या लियोनेल मेस्सीने खूप कमालीची कामगिरी केली. मेस्सी आता तरुणाईचा आदर्श झाला आहे. पण मेस्सीसारखे खेळाडू एका दिवसात तयार होत नाहीत. खूप जिद्द आणि चिकाटीने ते मेहनत करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही महत्वाचे ठरते. आजच्या तरुणांनीही अशाच पद्धतीने आदर्श ठेवून विविध क्षेत्रात आपले योगदान द्यावे, यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

संवाद, चर्चा, वादविवाद हे लोकशाहीचे वैशिष्ट्य – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, संवाद, चर्चा, वादविवाद हे आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य असले तरी सर्वांच्या एकत्रित सहभागातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय विधिमंडळात होतात. भूमिकेवर ठाम राहून सर्व पक्षाचे सदस्य विधिमंडळात जनहितासाठी काम करीत असतात. आपल्या संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जितका महत्वाचा तितकाच विरोधी पक्षही महत्वाचा आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ हे देशातील प्रमुख कायदेमंडळ म्हणून नावाजले जाते. आपल्या विधिमंडळाला मोठा इतिहास असून आपली संसदीय लोकशाही आदर्शवत आहे, असे ते म्हणाले.

श्री. नार्वेकर म्हणाले की, संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत राबविण्यात येत असलेला अभ्यासवर्गाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ज्याप्रमाणे शास्त्र शाखेचे विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करतात तशाच प्रकारे राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळ कामकाजाचे प्रात्यक्षिक करण्याची संधी या अभ्यासवर्गातून मिळते. हा अभ्यासवर्ग म्हणजे एक प्रकारे संसदीय लोकशाही प्रणालीची प्रयोगशाळाच आहे. सक्षम आणि ध्येयवादी नागरिक घडविण्यासाठी याचा उपयोग होईल. या अभ्यासवर्गाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विधिमंडळ, संसद ही सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षांची प्रतिबिंबे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकशाहीची रचना फार सुंदर केली आहे. विधिमंडळे किंवा संसद सभागृहे ही सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षांची प्रतिबिंबे आहेत. लोकशाहीतील सर्व संस्थांचा एकमेकांवर अंकुश आहे. चेक अँड बॅलन्स पद्धती असलेली आपली लोकशाही जगातील आदर्श लोकशाही आहे. कार्यकारी मंडळावर विधिमंडळाचा अंकुश असतो. विधिमंडळ कामकाजात सरकारला विरोधी पक्षासह सत्तारूढ पक्षातील सदस्यही प्रश्न विचारतात. एक प्रकारे आपल्या संविधानाने सरकारला विधिमंडळासाठी उत्तरदायी ठरविले आहे, असे ते म्हणाले.

विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय सरकारला एक पैसाही खर्च करता येत नाही.  लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून विधिमंडळाचे सदस्य सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात. लोकशाहीच्या आणि विधिमंडळाच्या अशा रचनेमुळे शेवटच्या माणसाचे प्रश्नही या सभागृहापर्यंत पोहोचतात. कामकाज करताना सभागृहात अनेक वेळा गोंधळ होत असला तरी नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ कामकाज केले जाते. कधी कधी रात्री बारा वाजेपर्यंत कामकाज करून दुसऱ्या दिवशी परत सकाळी नऊ वाजता कामकाजाला सुरुवात केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या लोकशाहीशी विद्यार्थ्यांचा निकटचा परिचय व्हावा, लोकशाही मूल्यांचा अभ्यास व्हावा यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या अभ्यासवर्गाची खूप चांगली परंपरा आहे. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती होईल. आपली लोकशाही समजून घेता येईल व त्यांच्या माध्यमातून आपल्या लोकशाहीचे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचेल. सर्वसामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार ॲड. आशिष शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन विधिमंडळाचे अवर सचिव सुनिल झोरे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!