चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट : अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि.९ : पुण्यात चोरांना पाहून पोलिसांनी धूम ठोकलेल्या घटनेची आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा करून देत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. उलट पोलिसांना बघून चोरांनी पळ काढला पाहिजे असं त्यांनी म्हटलं असून याचा परिणाम इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर होतो. अशा घटनांमुळे मनोबल घटतं अस मत त्यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर माई ढोरे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, “करोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. मात्र याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली. चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमधून उजेडात आली. चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळलं पाहिजे. उलट चोरांना बघून पोलीस पळतात हे असं करता कामा नये. त्या दोघांवर कारवाई केली. परंतु अश्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते”

पुढे ते म्हणाले की, “पोलिसांच्या मनोबलावर याचा वाईट परिणाम होतो. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याची नोंद सर्वांनी घ्यायला हवी. अशा घटना पुन्हा कदापी घडू नयेत याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे अशी ताकीद त्यांनी पोलिसांना दिली आहे”. “पोलिसांनी करोना काळात जोखीम पत्करून केलेल्या कामाला तोड नाही. ते कर्तव्य पार पाडत असताना पोलीस बांधवांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात घेतली जाईल,” अशी प्रशंसादेखील अजित पवारांनी यावेळी केली.

“शहरातील गुन्हेगारीचे साइड इफेक्ट बंद झाले पाहिजेत. शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत. सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. त्यात त्यांचा काय दोष? गुंडांकडून होणारा त्रास थांबला पाहिजे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगतो की, तो कुठल्या पक्षाचा, गटाचा, याचा विचार न करता महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी देखील गुन्हेगारीच्या निमित्ताने चुकीचं वागत असेल तर त्याला कडक शासन करा. मी तुमच्यासोबत आहे. अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा, मग मी त्या फोनवाल्या व्यक्तीकडे बघतो. माझी मतं आणि भूमिका स्पष्ट असते,” असं अजित पवारांनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “मेहबूब शेख प्रकरणाबाबत अद्यापपर्यंत काही तथ्य आढळले नाही. तपास चालू असून आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. जर कोणी चुकीचं वागलं असेल तर दोषी असल्यास कायद्याप्रमाणे शासन होईल. जर कोणाला कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न असेल आणि चारित्र्यहानन करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते देखील चुकीचे आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यातून सर्व माहिती समोर येईल”.


Back to top button
Don`t copy text!