आंतरराष्ट्रीय स्त्री- पुरुष समानता कार्यशाळेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळणे, ही गौरवाची बाब – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । मुंबई । भारतासह मेक्सिको, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, स्पेन या देशांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे लवकरच स्त्री- पुरुष समानता कार्यशाळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचे यजमानपद भूषविण्याचा मान महाराष्ट्राला मिळत आहे, ही गौरवाची बाब आहे. या कार्यशाळेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे सांगितले.

मेक्सिकोचे भारतातील डेप्युटी कौन्सिल जनरल ॲडॉल्फ गार्सिया एस्ट्राडा यांनी विधान भवनात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याने महिलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध धोरणे राबविली आहेत. महिला विकासाला राज्यात प्राधान्य देण्यात येते. राज्यात महिलांच्या समस्या निवारण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे. याशिवाय महिला व बालकल्याण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे.

या कार्यशाळेत महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंध, स्त्री- पुरुषांमधील असमानता दूर करणे, महिला विकासासाठी नावीण्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच खुली मुलाखत होईल. या कार्यशाळेसाठी मेक्सिको, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी व स्पेन या देशांचे प्रतिनिधी यांच्यासह महिला विकासासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित राहतील. या कार्यशाळेस उपस्थित राहणारे प्रतिनिधी क्षेत्रीय भेट देऊन राज्यात सुरू असलेल्या महिला विषयक कार्यक्रमांची पाहणी करणार आहेत.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ‘ऑरेंज डे’ संकल्पना, स्त्री आधार केंद्राची सविस्तर माहिती दिली, तर मेक्सिकोचे डेप्युटी कौन्सिल जनरल श्री. गार्सिया यांनी मेक्सिकोने अलिकडेच जाहीर केलेल्या स्त्रीवादी परराष्ट्र धोरणाची सविस्तर माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!