दिवा लावताना फडफडला, पाल मनाशी चुकचुकली !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दिवा लावताना फडफडला,
पाल मनाशी चुकचुकली!
गहिवर आला गळ्यात दाटुन,
खिन्न मान खाली झुकली!

दिवस फुलांचा होता नकळत,
रात्रीला खुपला काटा!
कधीच नव्हते ऐकायाचे,
की अपुले गेले टाटा!

आलेल्याला जाणे आहे,
नकळे कोणा द्यावे दूषण!
एक हुंदका कानी आला,
धाय मोकलुन पद्मविभुषण!

सर्व वाहने धावत असता,
खिळून गेली जागी अचानक!
अंदाजाला नाही कल्पना,
तर्काहूनही घडे भयानक!

भेट कोठली,दिसता फोटो,
मान झुकायाची खाली!
सैनिक आणि सामान्यांचा,
गेला कायमचा वाली!

पुजेएवढा पवित्र धंदा,
देशावरती निरलस माया!
चुकायचा हृदयाचा ठोका,
बघुनी अडखळताना काया!

मंथनाविना भारतात या,
रत्न पंधरावे आलेले!
शून्य असो वा असो अनंत,
टाटा सर्वांचे झालेले!

आज स्वतःहून राष्ट्रध्वजाला,
खाली यावेसे वाटेल!
देहादेहा स्वआसवानी
चिंब भिजावेसे वाटेल!

वैभवाप्रति येते जाता,
सचोटीसवे करूनी दान!
तेहेतीस कोटी उभे राहीले,
स्वर्गामध्ये द्याया मान!

कवी – अज्ञात


Back to top button
Don`t copy text!