दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जिल्हा बँकेच्या संचालकांनी खासदार उदयनराजेंनी मागितलेली माहिती देण्यास नकार दिल्याने ते संतप्त झाले. आज त्यांनी जिल्हा बँकेत येऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तसेच दाढी व मिशीवर हात फिरवत लयं मस्ती आलीयं वाटतं., असे म्हणत ते म्हणाले, माझी विनंती आहे, मी तुमच्या कोणाचा दुष्मन नाही. पण जिरवायची असेल तर माझी जिरवा सभासदांची नको. कारण जिल्हा बँक सभासदांची अर्थवाहिनी आहे, असे आव्हान खासदार उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या संचालकांना दिले.
जरंडेश्वर कारखान्याला केलेला कर्ज पुरवठा व ईडीला जिल्हा बँकेने दिलेली माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेला मागीतली होती. याबाबतचे लेखी पत्रही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना दिले होते. पण या मागणीवर शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले होते. कालच्या बैठकीत उदयनराजेंनी मागितलेली माहिती न्याय प्रविष्ट असून ही माहिती देता येत नाही, असा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आज संतप्त झाले. त्यांनी जिल्हा बँकेत येऊन याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणीही अधिकारी भेटले नाही. त्यानंतर त्यांनी बँकेच्या पोर्चमध्ये उभे राहून पत्रकारांशी संवाद साधला.
दाढी व मिशीवरून हात फिरवण्याची स्टाईल करत उदयनराजे म्हणाले, लय मस्ती आलीय वाटतं.. असे तुम्ही इकडच्यांना बघून घ्या, तुम्ही तिकडच्या बघून घ्या, टाईट करून जिरवू. माझी नका जिरवू असे सांगत उदयनराजे म्हणाले, माझी विनंती आहे, मी तुमच्या कोणाचाही दुष्मन नाही. हात जोडून विनंती करतो, बँक शेतकरी सभासदांची आहे. त्यांच्यावतीने मी विनंती करतो ही बँक सभासदांची ही अर्थवाहिनी आहे. त्यामुळे सभासदांची जिरवू नका. जिरवायची असेल तर माझी जिरवा. त्यातून समाधान होत नसेल तर मी प्रश्न विचारतो.
मी हे सर्व तडजोडीसाठी करत नाही. यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही. मी परिणामाला घाबरत नाही. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. संबंधितांनी सगळ्यांनी समजून घेऊन यातून बोध घ्यावा. मी शेतकऱ्यांच्या हिताचे बोलत आहे, असे सांगून उदयनराजे जिल्हा बँकेतून आपल्या समर्थकांसह निघून गेले.