असले कितीही आले कितीही गेले तरी काहीही फरक पडणार नाही : ना. श्रीमंत रामराजे; जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही व करणार नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुन २०२२ । फलटण । फलटण तालुक्यामध्ये कधीही जातीपातीचे राजकारण आम्ही केले नाही व यापुढेही करणार नाही. तालुक्याला एक संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचे काम आम्ही कायमच करत आलेलो आहे व यापुढेही करणार आहे. राजकारणाच्या वेळी सर्वांना योग्य ती उत्तरे दिली जातील. फलटणमध्ये असले कितीही आले व गेले तरी काहीही फरक पडणार नाही, असा टोला विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना लगावला.

फलटण येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

यावेळी बोलताना ना. श्रीमंत रामराजे म्हणाले की, लॉटरी लागुन खासदार झालेल्यांनी बोलुच नये. २०२४ साली सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहे. तुमची सर्व आवाहने मी स्विकारली आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये नक्कीच योग्य रित्या बघितले जाईल.

जर खासदारांना खरच ओबीसी व मराठा समाजाचा कळवळा असेल तर त्यांनी ओबीसी व मराठा आरक्षणा मिळत नाही म्हणून खासदारकीचा राजीनामा द्यावा. व नंतरच ईतर गोष्टी बोलाव्यात. फलटण तालुक्यात कधीही जातीपातीचे राजकारण आम्ही केले नाही व करणार सुध्दा नाही. फलटणमध्ये कोणालाही उमेदवारी देताना त्याची जात पात बघुन नाही तर त्याचे कर्तृत्व बघुनच उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे थोर साध्वी असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीमध्ये राजकारण करणार्यांनी सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचे राजकारण करू नये, असेही ना. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

सर्व महापुरुष मग त्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असोत किंवा मग श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज असोत यांची जयंती एका जातीधर्मात अडकुन राहू नये म्हणून आपण सर्वसमावेशक जंयती साजरी करण्याचा निर्णय फलटणमधुन करण्यात आल्यावर त्याचे अध्यक्ष पद मी स्वीकारले. कोणत्याही महापुरूषाला जातीपातीमध्ये अडकवणे योग्य नाही. सर्व समाजातील सर्वांनीच एकत्र येवुन जयंती उत्सव साजरे केले पाहीजेत. त्याची सुरवात फलटणमधुन झाली आहे, त्याबाबत नक्कीच आपल्या सर्वांना अभिमान आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

फलटण तालुक्याला एक आगळेवेगळी परंपरा आहे. फलटणमध्ये सर्वसमावेशक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. आमचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे अध्यक्ष असल्याने त्यांच्या पदाला साजेशी जयंती साजरी होत आहे. फलटणमध्ये कधीही जातीपातीचे राजकारण झाले नाही व यापुढेही होणार नाही, असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!