चंद्रभागेची पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे झाले स्पष्ट; भाविकांनो हे पाणी पिऊ नका आणि तीर्थ म्हणून नेऊ पण नका – गणेश अंकुशराव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । पंढरपूर । पंढरपूर येथील चंद्रभागेचे पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या भुजल सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे माघी वारीनिमित्त आलेल्या भाविकांनी चंद्रभागेचे पाणी पिऊ नये आणि तीर्थ म्हणून सोबतही नेऊ नये. असं आवाहन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केलं आहे.

चंद्रभागेच्या पात्रात प्रचंड असं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. याबाबत समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी आवाज उठवून शासनाचं आणि प्रशासकीय अधिकारी यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. एवढ्यावरच न थांबता अंकुशराव यांनी स्वखर्चाने या पाण्याच्या शुध्दतेची तपासणी महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उपविभागीय प्रयोगशाळा पंढरपूर यांचेमार्फत करून घेतली आहे.

वरील कार्यालयाच्या प्राप्त अहवालानुसार हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी भाविकांनी हे पाणी पिऊ नये व शासनाने चंद्रभागेचे पावित्र्य जपण्यासाठी आवश्यक ती पावलं आता तरी तातडीने उचलावीत, चंद्रभागेत त्वरीत पाणी सोडावे अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री तसेच संबंधित अधिकारी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चंद्रभागेच्या याच घाण पाण्याचा अभिषेक घालू. व मोठे जनआंदोलन उभारू असा इशारा गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडल्याची अफवा दिसून येत आहे कारण उद्या माघी यात्रेचा सोहळा असुनही आज चंद्रभागेच्या पात्रात पाणी आलेले नाही. माघी वारीनिमित्त गेल्या अनेक दिवसांपासून पंढरीत दाखल झालेले हजारो वारकरी चंद्रभागेचे हेच दुषीत पाणी तीर्थ म्हणून पीत आहेत. हे दुषीत पाणी पिऊन जर एखाद्या भाविकाच्या जीवितास धोका झाला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न ही अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.


Back to top button
Don`t copy text!