स्थैर्य, फलटण, दि. ०३ : फलटण शहर व तालुक्यातील कोविड रुग्णालयात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेऊन सर्व कोविड रुग्णालयात प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजी जगताप यांनी जमाव बंदी आदेश काढले आहेत.
फलटण शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या आवारात आणि रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक, मित्र मंडळी भेटणे, डबा देणे, औषध आणणे वगैरे कारणासाठी येत असल्याने तेथे होणारी गर्दी कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याने यापुढे रुग्णालय अथवा परिसरात नातेवाईक, मित्रमंडळी यांना गर्दी करता येणार नाही, रुग्णासोबत केवळ एकाला थांबता येणार असून या नातेवाईकांनी एकत्र थांबू नये यासाठी जमाव बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
रुग्णालय इमारत आणि परिसरात रुग्ण व नातेवाईकांच्या वावरातून कोरोना विषाणू प्रसार टाळण्यासाठी रुग्णालय इमारत व आवारात रुग्णालय प्रशासनाने हायपो क्लोराईड फवारणी करावी तसेच शहरात नगर परिषद फवारणी करणार असल्याचे निर्देश मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिले आहेत.