
स्थैर्य, गोखळी, दि. १७ सप्टेंबर : गोखळी गावठाण परिसरात सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे तयार करण्यात आलेला तात्पुरता सेवा रस्ता (सर्विस रोड) दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने चिखलमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक (यादव चौक) जवळच्या या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने २० ते २५ दुचाकीस्वार घसरून पडले, ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा दूरध्वनी बंद होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला नाही.
प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले होते. अखेरी-अखेरीस, ग्रामस्थांनी हा विषय माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणला.
या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन श्री. अभिजित नाईक निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाशी संपर्क साधला व त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
श्री. अभिजित नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनंतर तातडीने हालचाल होऊन सेवा रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला, ज्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित झाला आहे, अशी माहिती गोखळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. राधेशाम जाधव यांनी दिली. रस्त्याचे काम झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.