
स्थैर्य, सातारा, दि. 18 ऑक्टोबर : खटाव येथील माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. 20 ) सकाळी साडेआठ वाजता अंबाबाई मंदिर सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. युपीएससी परीक्षेत यश मिळवून भारतीय सांख्यिकी विभागात वर्ग एकचे पद मिळविलेल्या डिस्कळ येथील दिपाली आणि रुपाली कर्णे या जुळ्या भगिनींचे व्याख्यान आयोजिण्यात आल्याची माहिती खटाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी दिली.
खटाव पत्रकार संघ आणि विविध सार्वजनिक मंडळांतर्फे गेली 30 वर्षे विविध विधायक उपक्रम राबवून एम. आर. शिंदे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. आयएसएस अधिकारी असलेल्या कर्णे भगिनी यंदा स्पर्धा परिक्षेतील आव्हाने व त्यावरील उपाय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कर्णे भगिनी त्यांचा संघर्षमय प्रवास उलगडणार आहेत. याप्रसंगी त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अत्यंत महत्वाच्या विषयावरील व्याख्यान ऐकण्यासाठी खटाव आणि परिसरातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अंबाबाई क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यातआलेआहे.