स्थैर्य, मुंबई, दि. १८: इस्त्राईल कौन्सिल जनरल याकोव्ह फिंकेल्स्टिन यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांची मंत्रालयात भेट घेऊन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास या क्षेत्रात महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी करता येईल या विषयावर सविस्तर चर्चा केली.यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सह सचिव मानिक गुट्टे, उपायुक्त धनंजय परकाळे, अवर सचिव शैलेश केंडे, इस्राईलमधुन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक श्री.डन अलुफ आणि श्रीमती मिशेल जोसेफ यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
राज्यात शेतकऱ्यांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने या क्षेत्रात जगात अग्रगण्य असलेल्या इस्राईलच्या सहकार्याने पुढे जाण्यासाठी इस्राईल कौन्सिल जनरल याकोव्ह फिंगल्स्टिन यांच्यासमवेत मंत्रालयात चर्चा करण्यात आली. या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी वर्किंग ग्रुप स्थापन करण्याची व त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना श्री.केदार यांनी यावेळी दिल्या.
भारत इस्राईल दरम्यान सहकार्याच्या द्विपक्षीय कराराच्या अनुषंगाने कोणत्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य आणि इस्राईल यांच्यामध्ये सहकार्य होऊ शकते याबाबत विचार विनिमय करण्यात आला. तसेच इस्राईलचे प्रतिनिधी ऑनलाइन जॉईन होऊन, या क्षेत्रात पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाविषयी माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या आवश्यक बाबी आहेत याची माहिती दिली. प्रधान सचिव अनुप कुमार यांनी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा अनुभव नमूद करून पशुसंवर्धन क्षेत्र पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.