दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना आता कॉर्पोरेट लूक येणार आहे. धान्य दुकानांचे आय.एस.ओ. मानांकन करण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काही रास्त भाव दुकानदारांनी आपले रास्त भाव दुकान मानांकनासाठी तयार सुद्धा केले आहे. प्राथमिक स्वरुपात सातारा जिल्ह्यातील निसराळे येथील रास्त भाव दुकानास पुणे विभागीय उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांनी स्वत: आय.एस.ओ. टिम सोबत नुकतीच पहाणी केली. त्यांच्या समवेत जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
निसराळे येथील रास्त भाव दुकानदार अशोकराव पिसाळ यांच्या दुकानास भेट देवून श्री. कुलकर्णी म्हणाले, हे दुकान गुणवत्तापूर्ण असून त्यांचा आदर्श इतर रास्त भाव दुकानदारांनी घ्यावा.
आय.एस.ओ मानांकनामुळे रास्त भाव दुकानांचा पारंपारीक लूक बदलला जाणार असून रास्त भाव दुकानात स्वच्छता आणि पारदर्शी कामकाजाला प्राधान्य दिले जाणार आहे. रास्त भाव दुकानांसह सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामे, तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, जिल्हा पुरवठा कार्यालय सुद्धा आय.एस.ओ. मानांकनाच्या दृष्टीने तयारी करीत आहे. याचेही उपायुक्त श्री. कुलकर्णी यांनी कौतुक केले.