
स्थैर्य, फलटण दि.25 : फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेकायदेरशिररित्या गांजाची वाहतूक करणार्या इसमास अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. सदर कारवाईत आरोपीकडून सुमारे 4 किलो 628 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. सुमारास फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत शहरातील जिंती नाका येथे एक इसम होंडा शाईन मोटार सायकल क्रमांक – एम.एच .11 सी.वाय 4076 वरून लोणंद बाजूकडून येत होता. पोलीसांना त्याचा संशय आल्याने त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव युवराज बाळु मोरे, रा. कुंभारगल्ली, मलटण, फलटण असे सांगितले. चौकशीमध्ये मोरे हा बेकायदेशीररित्या गांजाची वाहतूक करीत असल्याची खात्री झाल्यानंतर पंचांचे समक्ष सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळील पांढर्या पिशवीमध्ये 12,300 / – रुपये किंमतीचा 4 किलो 628 ग्रॅम वजानाचा गांजा तसेच मोटार सायकल , रोख रक्कम , मोबाईल हॅण्डसेट व इतर साहित्य असा एकुण 65 हजार 750रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपी विरोधात सहायक पोलीस निरीक्षक एन.आर.गायकवाड यांनी दिलेल्या खबरी जबाबानसुार, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर हे करीत आहेत.