तब्बल वर्षभरानंतर ‘प्रकाश’ पडला हे सत्ताधाऱ्यांचे कौतुक की सातारकरांचे दुर्दैव? – आ. शिवेंद्रसिंहराजेंचा सवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वीच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्याचे काम डीपीडीसीमधून मंजूर झाले होते आणि पोल सुद्धा उभे झाले होते. फक्त विदयुत कनेक्शन नसल्याने पथदिवे सुरु नव्हते. मात्र सत्ताधाऱ्यांना कनेक्शन घेऊन प्रकाश पाडण्यासाठी वर्ष लागले यात सत्ताधाऱ्यांचे कौतुक म्हणावे की सातारकारांचे दुर्दैवं म्हणावे, असा खोचक सवाल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला असून सातारा पालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडणारच असा टोलाही त्यांनी लगावला.

गेल्या साडेचार वर्षात सातारा पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडरसाठी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अनेकदा कळवंडी झाल्या, एकमेकांचे गळे धरले गेले मात्र त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून नेत्यांनी आता निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे लक्षात येताच नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. सातारकरांचे काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवूनच ‘खोटं बोल पण रेटून बोल’  हा नेहमीचा पायंडा सुरु ठेवला आहे. हद्दवाढ झाल्यानंतर वर्षभरापूर्वीच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्याना जिल्हा नियोजनमधून मंजुरी मिळाली होती आणि सगळं काही उभं राहिलं होत पण, सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि खाबुगिरीमुळे कनेक्शन घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही आता पालिकेची निवडणूक आली म्हणून नेत्यांच्या डोक्यात ‘प्रकाश’ पडला आणि वर्षांनंतर का होईना पथदिव्याचे कनेक्शन घेऊन रस्त्यावर त्याचा प्रकाश पाडला गेला, हे उद्योग न कळण्याइतपत सातारकर दुधखुळे नाहीत.

निसर्गनियमानुसार आता परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे.त्याच पद्धतीने निवडणूक म्हटलं की सत्ताधारी नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊसही सुरु होणार, हे सातारकरांनाही चांगलेच पाठ झाले आहे. न केलेल्या आणि न होणाऱ्या विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडून नारळ फुटणार याची तयारी सत्ताधाऱ्यांबरोबर सातारकरांनी सुद्धा केलेली आहे. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षात पालिका भ्रष्टाचाराने धुवून निघाली आता दोनचार महिन्यात आणखी किती ‘प्रकाश’ पडतोय हेच सातारकरांना बघावे लागेल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!