स्थैर्य, मायणी, दि. 18 : मायणी, ता. खटाव येथील छ. शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मेडिकल कॉलेजमधील कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये करण्यात आलेल्या उपचारांनंर दोन रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या दोन्ही रुग्णांना बुधवारी टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.
जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. या पार्श्वभूमवर सोसायटीचे अध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बैठक होऊन मायणीतील रुरल इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर आणि इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. त्यापूर्वी येथे विलगीकरण कक्ष सुरू करून जिल्ह्यातील करोना संशयितांची व्यवस्था करण्यात आली होती. आता या रुग्णालयात आयसीयू वॉर्डदेखील सज्ज ठेवण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर्सही पुरविण्यात आले आहेत.
मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सध्या 13 करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी विसापूर येथील दोन रुग्ण बुधवारी करोनामुक्त झाल्याने त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. संस्थेचे संस्थापक डॉ. एम. आर. देशमुख, आ. गोरे, सचिव सोनिया गोरे, कार्यालय अधीक्षक संदीप देशमुख, डॉ. सागर खाडे, डॉ. सचिन चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.
दुष्काळी तालुक्यातील अद्ययावत रुग्णालय
दुष्काळी खटाव तालुक्यात आ. गोरे , डॉ. देशमुख यांच्या संकल्पनेतून पाचशे बेडचे अद्ययावत रुग्णालय उभे राहिले आहे. करोनाच्या संकटात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला असतानाच, मायणी मेडिकल कॉलेजमध्ये करोनावर उपचार होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.