स्थैर्य, मुंबई, दि.१८: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीकडून सिंचन घोटाळ्याची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोत्यात येऊ शकतात.
राज्य सरकारने सध्या जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) सिंचन घोटाळ्याचा तपास सुरू होता. 2014 च्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षात असलेले भाजप सत्तेत आले तर सिंचन घोटाळ्यातील दोषींना कारागृहात पाठवू असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सिंचन घोटाळ्याची चौकशी पुढे गेली नाही.
दरम्यान असे असले तरीही भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने लक्ष केले जात होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत घडलेल्या राजकीय नाट्याच्या वेळी अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत देवेंद्र फडणीवस यांच्यासोबत पहाटे पहाटे शपथविधी उरला होता. यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून न्यायालयात अजित पवार यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते.