आंबेगाव-शिरुर येथील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी – जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । मुंबई । पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जलसंपदा विभागाच्या आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, आंबेगाव तालुक्यातील लोणी आणि धामणी परिसरास पाणी देण्यासाठी नियोजित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेसाठी सर्व्हेक्षण करावे. आदिवासी भागातील कळमजाई उपसा सिंचन योजनेचे चालू असलेले सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करुन घ्यावे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, शिरूर तालुक्यातील पाबळ आणि परिसरातील १२ गावांच्या परिसरास पाणी देण्यासाठी योजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. पाबळ, केंदूर आणि करंदी गावातील प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षण करणे आणि साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) बसवंत स्वामी, कार्यकारी संचालक विलास रजपूत, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, डिंभे धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सं. ज. माने, कुंडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं.गा. सांगळे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!