साताऱ्यात लवकरच प्रशस्त मेडिकल कॉलेज उभे राहणार : जागेचा प्रश्न निकाली निघताच पाटबंधारे कार्यालयात पेढे भरवून झाला आनंदोत्सव साजरा
स्थैर्य, सातारा, दि. ३० : यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले मी जलसंपदा व सातारा जिल्हा पालकमंत्री असताना त्यावेळच्या सरकारमध्ये कॅबिनेट मध्ये सातारा येथे मेडिकल कॉलेज करण्यासंदर्भात निर्णय घेतला. तो निर्णय होत असताना काही वर्षांत या विषयाला काही अडथळे आले. हा विषय मार्गी लागला नाही याची खंत होती. मधील काळात सरकार बदलले होते व त्यांनी फक्त आश्वासने देण्याचे काम केले होते. आदरणीय शरद पवार साहेबांचे सातारा जिल्ह्यावर असलेले प्रेम पाहता, साताऱ्याच्या जनतेच्या स्वप्नाच्या पुर्ततेला उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. २८ जून रोजी संबधित अधिकारी व मंत्र्यांची बैठक घेऊन त्यासंदर्भात निधी उपलब्ध व जागेच्या बाबतीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जागेची पाहणी करून निर्णय घ्यावा असे सुतोच केले. त्यासंदर्भात ना. जयंत पाटील यांनी २९ तारखेला या जागेची पाहणी केली . यावेळी माझ्यासोबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, राष्ट्रवादी सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने उपस्थित होते.साधारण रात्री १० वाजता हा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला. ६० एकर जमिन मेडिकल कॉलेजसाठी मिळाली आहे. मेडिकल कॉलेज होण्याचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत याच सरकारच्या आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली होत आहे, याचा आनंद आहे. त्या काळात सातारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मेडिकल कॉलेजचा कॅबिनेट मध्ये मी मांडलेला प्रस्ताव व कृष्णा लगतची देऊ केलेली जागा याचा अंतिम निर्णय होण्याचा आनंद याठिकाणी आहे.