दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘त्यांनी कारखाने दुसर्याला चालवायला दिले, बँक पतसंस्थेला चालवायला दिली, दूध संघाचा लिलाव काढला, खरेदी विक्री संघ गायब केला अशी सहकाराला बुडवणारी कर्तृत्त्वशून्य माणसं गेली 30 वर्षे आपल्या इथं सत्तेत आहेत. त्याउलट आपण स्वत:च्या वडिलांच्या नावाने साखर कारखाना सुरु केला. खासदारकीच्या काळात रेल्वे, रस्ते, पाणी आणले. आपण पुन्हा खासदार झालो असतो तर हमखास आपल्याला मंत्रिपद मिळाले असते, आणि त्यातून आणखीन विकास झाला असता’’, असे विधान माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ ढवळ, ता.फलटण येथे आयोाजित कोपरासभेमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी उमेदवार सचिन पाटील, माणिकराव सोनवलकर, जयकुमार शिंदे, अॅड.नरसिंह निकम यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रागापोटी रामराजे इकडं पाणी पोहचू देत नव्हते
‘‘गेल्या 15 वर्षात आमदार दीपक चव्हाण कधी तुमच्याकडे आले होते कां?’’, असा सवाल करुन ‘‘दुष्काळात ढवळ येथे जनावरांची छावणी आपण चालवली. शेतकर्यांना मदत केली. जबाबदारीपासून आपण कधी माघारी फिरलो नाही. आमदारकी, खासदारकी नसली तरी काम करताना लोकांविषयी आपुलकी लागते; ती आपुलकी मी कायम जपली आहे आणि ढवळकरांनीही माझ्याविषयी आपुलकी जपली आहे. अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेत इथलं प्रतिनिधीत्व करत असताना रागापोटी रामराजे इकडं पाणी पोहचू देत नव्हते. पण त्यावेळी वाटेल ते करुन ढवळचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. पूर्वी इकडं फक्त पाऊस झाला तरच पाणी येत होतं. पण खासदार झाल्यावर ढवळ आणि आसपासच्या परिसरात चारमाही वरुन बारमाही पाणी उपलब्ध करुन देण्यात आपण यशस्वी झालो. ढवळमध्ये जे – जे शब्द दिले ते मी सगळे पूर्ण केले आहेत’’, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
ढवळ गावात सगळ्या रस्त्यांचे 100% डांबरीकरण आपण करु
‘‘आज ‘ते’ पक्ष बदलून ज्या तुतारीकडे ते गेले आहेत. त्या शरद पवारांनी इतकी वर्षे सत्तेत असताना कधीही आपले चांगले केले नाही. उलट अजित पवारांनी आपल्याला रेल्वेला मदत केली. जे बोलतात तेच करणार्या अजितदादांच्या नेतृत्त्वात आपला उमेदवार आहे ; आणि जे बोलतात ते कधीच करत नाहीत अशा शरद पवारांच्या नेतृत्त्वात विरोधी उमेदवार उभा आहे. लाडक्या बहिणींचा सन्मान करणारे, शेतकर्यांची कर्जमाफी करणारे, शेतकर्यांना मोफत वीज देणारे, महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देणारे आपले महायुतीचे सरकार आहे. आपले सचिन पाटील जर आमदार झाले तर येत्या जानेवारी – फेब्रुवारी पर्यंत बारमाही झालेल्या आपल्या पाण्याचे आपण पूजन करु, ढवळ गावात सगळ्या रस्त्यांचे 100% डांबरीकरण आपण करु’’, असे अभिवचनही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
कोपरासभेस ढवळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.