“शरद पवारांचे मत काहीही असो, अदानी घोटाळ्याची चौकशी जेपीसीकडूनच व्हावी” – नाना पटोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । मुंबई । अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत काहीही असो या घोटाळ्याचे सत्य बाहेर येण्यासाठी जेपीसी चौकशी झालीच पाहिजे, असे मत  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जेपीसीमध्ये सत्ताधारी पक्षाची सदस्य संख्या जास्त असते तरिही सर्व पक्षाचे सदस्य सुद्धा या समितीत असतात. अदानी घोटाळ्याची सत्य परिस्थिती बाहेर आली पाहिजे त्यासाठी जेपीसी गरजेची आहे. युपीए सरकारच्या काळात कोळसा घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कोर्टाची समिती स्थापन करण्यात आली होती तरिही विरोधकांच्या मागणीवरून संयुक्त संसदीय समितीची स्थापन केली होती. अदानी घोटाळ्यावर खासदार शरद पवार यांचे वेगळे मत असले तरीही जेपीसी चौकशीवर काँग्रेस ठाम आहे.

अदानी समुहात एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएफचे पैसे मोदी सरकारने बेकायदेशीरपणे गुंतवण्यास भाग पाडले. हिंडनबर्गच्या अहवालाने अदानी समुहातील गैरव्यवहार उघड झाला आणि जनतेचा पैसा सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना पंतप्रधान मोदी अदानी घोटाळ्यावर का बोलत नाहीत? घोटाळा नसेल तर घाबरण्याचे कारण काय? ‘कर नाही तर डर कशाला?’ असा सवालही नाना पटोले यांनी विचारला.


Back to top button
Don`t copy text!