स्थैर्य,नवी दिल्ली,दि ११: ऍपल कंपनीच्या आयफोन -12 या मॉडेलचे उत्पादन भारतात सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारने मेक इन इंडियाला चालना दिल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यासंदर्भात आग्रह केला होता. त्याला अनुसरून ऍपल कंपनीने आपल्या फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या पुरवठादारांना भारतात उत्पादन करण्यास सांगितले होते.
भारतात तयार झालेले उत्पादन भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात येईल. त्याचबरोबर भारतात तयार करण्यात आलेले उत्पादन निर्यात करण्यात येणार असल्याचे ऍपल कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नेमक्या कोणत्या पुरवठादाराने भारतात उत्पादन सुरू केले आहे याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली नाही. मात्र सूत्रानुसार फॉक्सकॉन कंपनीने दक्षिण भारतातील आपल्या प्रकल्पाचे उत्पादन सुरू केले आहे. याबद्दल माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी समाधान व्यक्त केल. यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल असे प्रसाद म्हणाले.