दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२३ । सातारा । अटल भूजल योजनेअंतर्गत लोकसहभागातून व्यवस्थापनासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण अटल भूजल योजनेतील 115 गावांनी स्पर्धेमध्ये 25 एप्रिल 2023 पर्यंत सहभागी व्हावे असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा यांनी केले आहे.
भूजल उपसा नियंत्रित करून भूजल स्तर उंचावण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जाईल. अतिशोषित व शोषित आणि अंशत:शोषित वर्गवारीतील गावांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. नगदी पिकांसाठी विहीर आणि विंधन विहिरीद्वारे बेसुमार उपशामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. तसेच भूजलाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी जिह्यातील 115 गावात केंद्र शासन पुरस्कृत ही अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे.
राज्यातील 13 जिल्हांमधील 73 पाणलोट क्षेत्रातील 1339 ग्रामपंचायतीमधील 1443 गावांमध्ये ही योजना राबवली जात आहे. अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावांनी स्पर्धेत सहभागासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या ठरावाच्या प्रतींसह जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्याकडे 25 एप्रिलपर्यंत प्रस्ताव द्यावेत.
सन 2022-23 व 2023-2024 या दोन वर्षासाठी ही स्पर्धा आहे. दोन्ही वर्षांसाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. जिल्हास्तरावर विजेत्या गावाला 50 लाखांचे बक्षीस आहे. या गावाला पुढे राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेता येईल. जिल्हास्तरावर द्वितीय बक्षीस 30 लाख व तृतीय बक्षीस 20 लाख रुपये आहे. राज्यस्तरावरील विजेत्यासाठी पहिले बक्षीस एक कोटी रुपये आहे.