संयोजन समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साहित्य संमेलनासाठी निमंत्रण


मुंबई – येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण देताना मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंह राजेभोसले, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी समवेत मंत्री जयकुमार गोरे.

स्थैर्य, पुणे, दि. 24 डिसेंबर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संयोजन समितीच्या वतीने बुधवारी (दि. 24) मुंबई येथे जाऊन निमंत्रण देण्यात आले.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्यासह महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी (सातारा), मावळा फौंडेशन यांना 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. संमेलन दि. 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप समारंभास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची उपस्थिती असणार आहे.संमेलनाची तयारी उत्तम रितीने सुरू असल्यामुळे हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उद्योग व भाषामंत्री उदय सामंत, सातारचे पालकमंत्री शंभुराज देसाई, फलोत्पादन, रोजगार हमी, खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनाही प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले आहे.

स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री महोदयांना संमेलनाच्या वेगळेपणाविषयी माहिती दिली. सातारा शहरात 33 वर्षांनंतर संमेलन होत असल्याने सातारकर मंडळी मोठ्या उत्साहाने हे संमेलन यशस्वी होण्याकरिता प्रयत्नरत आहेत. महाराष्ट्रास देश-विदेशातून येणार्‍या साहित्य रसिकांना योग्य त्या सोयीसुविधा मिळण्यासाठी महामंडळ आणि संयोजक संस्था विशेष प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

 


Back to top button
Don`t copy text!