मरडवाक येथील नंदीवाले वस्तीवरील लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देताना मान्यवर कार्यकर्ते.
स्थैर्य, कातरखटाव, दि. २४ : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना बेकायदेशीर जमाव जमवून धिंगाणा घालणार्या मरडवाक (ता. खटाव) येथील नंदीवाले वस्तीतील नागरीकांच्या बेशिस्त वर्तनाची चौकशी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्करशेठ चव्हाण व ग्रामस्थांनी निवेदनद्वारे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी : चव्हाण यांचे घरामध्ये आई मालन जगन्नाथ चव्हाण (वय 80) वडील जगन्नाथ गोपाळ चव्हाण (वय 85), बंधू चंद्रकांत जगन्नाथ चव्हाण (वय 60), राजू जगन्नाथ चव्हाण (वय 55), वहिणी जयश्री चंद्रकांत चव्हाण, रुपाली राजू चव्हाण तसेच त्यांची मुले असे एकुण 20 ते 22 मुले-मुली हे एकत्रित कुटुंब वास्तव्यास आहेत.
त्यांचे घरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर भटक्या विमुक्त नंदीवाले समाजाची लोक राहतात. या ठिकाणी लॉकडाऊन असताना चिपळूण (जि. रत्नागिरी) तसेच कोकण भागातून काही लोकांची सतत ये जा सुरु असते. या ठिकाणी आठवड्यातून दोन ते तीन वेळा बोकड कापणे, तसेच यात्रा, जत्रांचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमात वस्तीवरील व बाहेरुन येणारे लोक मध्य प्राशन करुन रात्री उशिरापर्यंत धांगड धींगा घालत असतात. कोरोना काळात यात्रा, जत्रांना बंदी असूनसुध्दा हे लोक राजरोसपने असे कार्यक्रम करण्याबरोबर बाहेरुन येणार्या लोकांना आपले घरामधे आसरा देत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गजन्य आजाराचा धोकाही निर्माण होवू शकतो. त्यांच्या या कृत्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याबरोबर आजू-बाजूच्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी महसूल व पोलीस प्रशासनाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. नायब तहसिलदार कमलाकर भादुले , उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. यावेळी नगरसेवक शहाजी गोडसे, विपुल गोडसे, मिहीर गोडसे, विकल्प गोडसे, राहुल गोडसे, लखन लोहार आदी उपस्थित होते.