सदोष बियाण्यांच्या तक्रारीची तातडीने तपासणी करा – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांची समिती गठित

स्थैर्य, मुंबई, दि. २३: सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी काही  शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्याची तातडीने दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीने करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज विभागाला दिले. याप्रकरणी संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई  करण्याची सूचना कृषिमंत्री भुसे यांनी आज दिली.

सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नाही याच्या अभ्यासासाठी परभणी कृषि विद्यापीठातील सोयाबीनचे शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे-खते उपलब्ध व्हावेत यासाठी कृषिमंत्री गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करीत असताना शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषिमंत्र्यांकडे केल्या होत्या. कृषिमंत्र्यांनी काही शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली.

उस्मानाबाद, सोलापूर येथे झालेल्या कृषि आढावा बैठकांमध्ये त्यांनी कृषि अधिकाऱ्यांना बियाणे खते शेतकऱ्यांना उपलब्ध होतानाच शेतकऱ्यांच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका असे सांगितले. आज कृषिमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाचा दौरा केला. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असेही आवाहनह कृषिमंत्री आपल्या दौऱ्यात शेतकऱ्यांना करीत आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन  तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक यांना  ना. भुसे यांनी दिल्या.

बियाण्यांची उगवण क्षमतेच्या तक्रारीची तातडीने पडताळणी करण्यासाठी पथकाची  संख्या वाढविण्यात येत असल्याचे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!