म्युकरमायकोसिसच्या अटकावासाठी कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि.२८: जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण उपचार घेत आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या आणि रक्तामध्ये शर्करा असणाऱ्या नागरिकांना म्युकरमायकोसिसचा असलेला धोका ओळखून कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

उपजिल्हा आणि ग्रामीण रूग्णालयात होणार तपासणी

पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. या दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांची तपासणी केली जाते. याचपद्धतीने उपजिल्हा रूग्णालय आणि ग्रामीण रूग्णालयात 31 मे ते 5 जून या सप्ताहात अभियान राबवून कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करा. म्युकरमायकोसिसचा धोका ओळखण्यासाठी दंतचिकित्सकाकडून दंत तपासणी, रक्तशर्करेचे प्रमाण तपासले जाणार आहे. या तपासण्या मोफत करण्यात येणार असून नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

म्युकरमायकोसिसच्या रूग्णांना अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनची कमतरता पडू देऊ नका. शासनाकडे जादा मागणी नोंदवून रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करा. अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनशिवाय दुसऱ्या प्रभावी इंजेक्शनची माहिती घ्या. औषधे असतील तर त्याचाही विचार करा. आज 500 इंजेक्शन प्राप्त झाली असून इंजेक्शनशिवाय म्युकरमायकोसिस रूग्णांचा मृत्यू होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

कोरोनाविषयक पुस्तिकेद्वारे पालक, मुलांचे समुपदेशन करणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तिसरी लाट गृहीत धरून सर्व यंत्रणेने काम करावे. पालक आणि बालकांना कोरोनाची माहिती व्हावी, कोरोना होऊ नये किंवा झाला तर काळजी कोणती घ्यावी, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पुस्तिका काढून समुपदेशन करणार आहे.

जिल्ह्यात 0 ते 3 वर्षांची सुमारे तीन बालके आणि 0 ते 18 वयोगटातील  सुमारे 11 लाख 92 हजार बालके आहेत. बालकांना कोरोना होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र झालाच तर ते एकटे दवाखान्यात राहू शकत नाहीत. त्यादृष्टीने बालकांच्या पालकांचे लसीकरण घेण्याचे नियोजन करा. 7 वर्षांच्या पुढील बालकांना माहिती पुस्तिकेचा उपयोग होणार असून त्यांना त्यांच्या भाषेतील सचित्र पुस्तिका देण्यात येणार आहे. बालकांच्या रक्ताची तपासणी जिल्हाभर सुरू असून ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे.

यंत्रणेने बालकांच्या बेडविषयी काम करावे. यासाठी टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ आणि बालमृत्यू आढावा समितीच्या बैठका घेऊन त्यांच्या सूचनेनुसार काटेकोर नियोजन करा. जिल्ह्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी बालकांसाठी ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन त्वरित पूर्ण करा. जिल्ह्यातील 10 ऑक्सिजन प्लान्टचे काम वेगाने करा, आणखी वाढीव प्लान्टचेही नियोजन करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.

ग्रामीण भागात बालकांच्या विलगीकरणाची व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील सात ते आठ आणि शहरातील 17 बालरूग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी बेडची उपलब्धता करून देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरात सध्या 60 टक्के ऑक्सिजनचे बेड शिल्लक असून 39 व्हेंटिलेटर आणि 115 आयसीयू बेड शिल्लक आहेत, ही आशादायक बाब आहे. रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 99 वरून 128 टक्के झाला असून पॉजिटीव्हीटी दर कमी होऊन 12.19 टक्के झाला आहे. मृत्यूदरही कमी होत आहे. जिल्ह्यात सध्या 10143 रूग्ण उपचार घेत असून नागरिकांनी सतर्कता घ्यायला हवी. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्यात आता नियमित लस येत असून रोज 15 हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. शहरात रूग्णसंख्या कमी होत आहे. यापुढे शहराच्या तुलनेत जिल्ह्याला जास्त लस देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

लसीकरण आणि कोरोना रूग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करीत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकाविण्याचे, मारहानीचे प्रमाण वाढत आहे. ही बाब गंभीर आहे, असे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्याचे निर्देशही श्री. भरणे यांनी दिले.

श्री. शंभरकर म्हणाले, गृह विलगीकरण पूर्णपणे बंद केले असून सध्या 1035 रूग्ण आहेत. ते रूग्ण गरोदर माता, लहान मुले, वृद्ध आहेत, तेही पूर्णपणे बरे झाल्याने गृह विलगीकरण यापुढे राहणार नाही. जिल्ह्यात गावनिहाय लसीकरणाचे वाटप केल्याने गर्दी आपोआप कमी झाली आहे.

श्री.स्वामी म्हणाले, जिल्हास्तरीय बालमृत्यू आढावा समिती आणि ग्रामस्तरीय दक्षता समित्यांची नियमित बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. 1027 ग्रामपंचायतींनी ग्राम दक्षता समिती नेमून काम प्रभावीपणे सुरू केले आहे. रूग्णांची तपासणी, उपचार, सोय दक्षता समिती करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचा आराखडा तयार केला असून अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या माध्यमातून बालकांचे समुपदेशन करण्याचे नियोजन सुरू आहे.

डॉ. ढेले यांनी तंबाखूविरोधी दिनाविषयी माहिती दिली. श्री. शिवशंकर यांनी शहरातील कोरोना स्थिती, उपाययोजना तर डॉ. पिंपळे यांनी ग्रामीण स्थिती मांडली.


Back to top button
Don`t copy text!