दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२१ । अमरावती । गरीब, वंचित तसेच गरजू ग्रामीण नागरिकांना सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात अनेक कार्यक्रम राबविले जातात. तथापि, जिल्हा यंत्रणेकडून त्यांची चांगली अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अभियानातील अनेक कामांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. या सर्व बाबींची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी व्हावी व जबाबदारांवर कारवाई व्हावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
अभियानातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संसर्गजन्य व असंसर्गजन्य, स्थानिक रोगांच्या साथीचा प्रतिकार व नियंत्रण, एकात्मिक प्राथमिक आरोग्य सुविधांचा वापर वाढविणे,आरोग्यदायी जीवनाचा प्रचार व प्रसार, प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण, आरोग्य सेवांचा वापर वाढविणे, उपकेंद्राला स्थानिक नियोजन करण्यासाठी सक्षम करणे आणि बहुउद्देशीय कार्यकर्त्यांची उपलब्धता वाढविणे अशी कितीतरी कामे करण्यासाठी मोठा निधी या अभियानात उपलब्ध करून दिला जातो. मात्र, त्या प्रमाणात सुविधांची वाढ झाल्याचे दिसत नाही. अनेक कामे अपूर्ण आहेत. अनेक कामे निकृष्ट दर्जाची असल्याबाबत ग्रामीण भागातून तक्रारी प्राप्त आहेत. या सर्व बाबींची चौकशी त्रयस्थ यंत्रणेकडून व्हावी व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात
ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे सुरु करण्यात आली. मात्र, अनेक कामे अपूर्ण आहेत. पथ्रोट, शिराळा व करजगाव येथील पीएचसीचे काम गतीने पूर्ण करावे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. यापूर्वीच्या सर्व कामांचे छायाचित्रांसह सविस्तर व सुस्पष्ट सादरीकरण करावे. कामांचे नियोजन व अंमलबजावणी या दोहोंबाबत पारदर्शकता असली पाहिजे. लोकप्रतिनिधींना त्याबाबत माहिती दिली पाहिजे. त्यांच्या सूचना विचारात घेऊन परिपूर्ण नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, यंत्रणेकडून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. सादरीकरणातही सुस्पष्टता नाही. हे गंभीर असून, या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी. आपण स्वत: ठिकठिकाणी भेट देऊन आरोग्य केंद्राच्या कामांची पाहणी करू, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
उपकेंद्रांसाठी मनुष्यबळ मिळवा
बृहद आराखड्यात पूर्ण झालेल्या उपकेंद्रांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नांदगावपेठ व खोलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तेथील लोकसंख्या पाहता तिथे ग्रामीण रुग्णालय होणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता पाहता संपूर्ण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा योजना, कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम, वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम, पॅलिएटिव्ह कार्यक्रम, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, मौखिक आरोग्य कार्यक्रम आदी विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या कामांबाबत समग्र आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.