दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२३ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव आसिमकुमार गुप्ता यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. २८, बुधवार दि. २९ आणि गुरुवार दि. ३० मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.
जागतिक हवामान बदलामुळे उष्ण लहरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअनुषंगाने वेळीच खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्य शासनामार्फत यासंदर्भातील माहिती संकलित करण्यात येत असून त्यावर कोणत्या उपाययोजना राबविता येतील यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे. उष्ण लहरींच्या वाढत्या प्रभावाने मनुष्यजातीचे शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा विविध पद्धतीने नुकसान होताना दिसत आहे. उष्णतेच्या बचावासाठी असलेल्या कृती आराखड्याबरोबरच माहितीचा प्रसार, पायाभूत सुविधा, वर्तणूक, संस्थापक क्षमता निर्माण करणे, तांत्रिक, नैसर्गिक घटकांचा वापर करुन उष्माघातापासून कसे वाचता येऊ शकेल, अशा विविध विषयांवर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.