
दैनिक स्थैर्य । 2 मे 2025। पुणे । महाराष्ट्र कामगार कल्याण भवन, सहकारनगर येथे 1 मे 2025 रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात, सन्मानाने व सामाजिक जाणीवेने साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण प्रमुख पाहुणे शिवराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्य गीत आणि भारतीय संविधानातील नागरिक प्रतिज्ञा वाचन करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमान, राज्यगौरव व संविधाननिष्ठा यांची सशक्त भावना निर्माण झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 चे मानकरी शिवराज शिंदे, कामगार अधिकारी सौरभ हामंद उपस्थित होते. सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी ‘कामगार कायद्यांचा परिचय’ या पुस्तकाचे वाटप केले.
शिवराज शिंदे म्हणाले, कामगार वर्गाचा सन्मान, संरक्षण व सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. तसेच महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना, राज्य निर्मितीमागील जनआंदोलन, भाषा आंदोलन व सामाजिक समतेचा संघर्ष त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
मॉडर्न गर्ल्स हायस्कूलच्या उपप्राचार्या डॉ. उज्वला मोरे यांनी कामगार कायद्यांचा इतिहास, त्यातील मूलभूत अधिकार, कामगार सुरक्षा, वेतन, विश्रांती, महिला व बालकामगारांचे संरक्षण, आणि कामगार न्यायालयांची भूमिका याबाबत माहिती दिली. तसेच कामगार कायदे कामगार वर्गाला सन्मानाने जगण्याचा आणि न्याय मिळवण्याचा हक्क देणारे आधारस्तंभ आहेत. छ. शिवाजी महाराजांपासून सुरू झालेली स्वराज्याची चळवळ, पुढे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणि मराठी अस्मितेचा उगम यांचा थेट संबंध आजच्या महाराष्ट्र दिनाशी जोडून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.
केंद्रप्रमुख श्री सुहास माने यांनी परिश्रम घेतले. अधीक्षक संजय थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक लेखाधिकारी प्रमोद जोशी, सामाजिक कार्यकर्ते शेखर कोरडे, ढोबळे यांच्यासह कामगार प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते.