
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025। फलटण । मुधोजी महाविद्यालय तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रे विभाग आणि ग्लोबल फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, भारतीय ज्ञान प्रणाली व त्यामध्ये येणार्या मानवी जीवनाशी संबंधित सर्वच ज्ञान शाखांचा आजही आपल्या जीवनासाठी उपयोग होऊ शकतो.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रवीण सप्तर्षी म्हणाले, भारतीय प्राचीन ज्ञान परंपरेचा, कला, संगीत, तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य या सर्वच अंगांनी त्यावेळी आपण किती समृद्ध होतो. आजही या ज्ञानाचा भारतीय समाजाच्या विकासामध्ये निश्चितच वाटा राहील. हे ज्ञान आपण अवगत केले पाहिजे. इतिहासातून बोध घेऊन सुधारले पाहिजे हे ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला समजू शकते.
या परिषदेत ज्येष्ठ तत्त्वचिंतक डॉ. प्रदीप गोखले, पुणे, प्रा. आय. एस. कुंभार बेळगाव, प्रा. जिंगर राजस्थान, प्रा. मैधा अहमद, इराण यांनी भारतीय ज्ञान प्रणालीच्या अनुषंगाने विचार व्यक्त केले.
प्रा प्रदीप गोखले यांनी पतंजली योग दर्शनातील यम, नियम तसेच मोक्षाची साधना करताना चित्तशुद्धीसाठी दृष्टिकोनातून वेदांतातील साधन चतुष्य तसेच, बौद्ध तत्वज्ञानातील मैत्री, मुदिता आदि पंचशीलाचा तसेच अनेकांत वाद त्यातील सहिष्णुता वृत्ती अनुवृत्ते महावृत्ते या मूल्यांचा आढावा घेतला. आजच्या काळात विपश्यना, ध्यान यांची मानसिक शांती आणि स्थिरतेसाठी किती गरज आहे अधोरेखित केले. प्रा. आय. एस. कुंभार यांनी प्राचीन भारतीय सत्ताशास्त्रचा विकास अन्वय आधुनिक काळापर्यंत कसा झाला या अनुषंगाने चर्चा करून आपली मांडणी केली.
प्रा जिंगर यांनीही भारतीय ज्ञान- शहाणपण व त्याचे महत्त्व महत्त्व त्यामध्ये विशेषतः बौद्ध दर्शनाच्या परिप्रेक्ष्यातून सबंध भारतीय जीवन किंवा जागतिक मानवी जीवनाला कसे मार्गदर्शन होऊ शकते यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. प्रा. डॉ. मैधा अहमद यांनी भारतीय ज्ञान प्रणाली जागतिक संदर्भात आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये आणि वातावरणासाठी काय दिशा देऊ शकते या संदर्भात विचार मांडले.
यानंतर दुपारच्या सत्रात जगभरातील अनेक राष्ट्रांमधून ऑनलाइन उपस्थित असलेले प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक यांनी वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आपले संशोधन पर शोधनिबंध सादर केले.
या सत्राचे अध्यक्ष डॉ. कृतिका सूद यांनी काम पाहिले. या परिषदेत 30 शोधनिबंध वाचण्यात आले. यावेळी जगभरातून जवळजवळ 200 शोध निबंध, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमधून आले आहेत.
प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी फलटण एज्युकेशन सोसायटी, मुधोजी महाविद्यालय तसेच तत्त्वज्ञान विभाग आणि भारतीय ज्ञान प्रणालीचे सद्यस्थितीतील महत्त्व याविषयी माहिती दिली. विज्ञान विभाग प्रमुख मोनाली पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. एन. के. रासकर, प्रा. डॉ. टी. पी. शिंदे, प्रा. जगताप. प्रा निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रियांका देशमुख, प्रा. कोमल कुंभार, डॉ आकाश जाधव, ऋषिकेश कुंभार यांनी तंत्रज्ञानाच्या संदर्भात काम पाहिले. प्रा. डॉ. एन. के. रासकर यांनी आभार मानले. या परिषदेला भारतासह इराण, नेपाळ अशा देशांमधून जवळजवळ 150 मान्यवर उपस्थित होते.