
स्थैर्य, सातारा, दि. 11 डिसेंबर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्यात दि. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. या साहित्य संमेलनात सादर होणार्या समूहगीत गायनाकरता विद्यार्थी उपलब्ध करुन देण्याबाबत इच्छुक शाळा, महाविद्यालयांनी संपर्क साधावा असे आवाहन 99 वे संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.
पत्रकात, साता-यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि साता-याच्या लौकिकाला साजेसे होण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. संमेलनात नाविन्यूपर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात 3 समूहगीते सादर केली जाणार आहेत.
ही समूहगीते 99 विद्याथी-विद्यार्थिनींच्या माध्यमातून सादर होणार असल्याने इच्छुक विद्यालयातील, महाविद्यालयातील 8 वी ते 12 वी मधील 4 गायक विद्यार्थी- विद्यार्थिनी (2 मुले, 2 मुली )यांची निवड करुन त्यांची नावे समूहगीत गायन समितीकडे कळवण्यात यावी. समूहगीत गायन निवड समितीमार्फत अशा सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची निवड तज्ज्ञांच्या माध्यमातून करुन त्यांना समूहगीत गायनाकरता संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी इच्छुक शाळेतील, महाविद्यालयातील 8 वी ते 12 वी मधील 4 गायक विद्याथी-विद्यार्थिनी यांची निवड करुन त्यांचे नावे समूहगीत गायन समितीचे मुख्य समन्वयक सुजीत शेख (9022176662) यांच्याकडे व्हॉटसपर पाठवण्यात यावीत.

