स्थैर्य, फलटण, दि. २४ : फलटण तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांपैकी एक, तीव्र लॉक डाऊन संकल्पनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २४ मे रोजी रात्री १२.०० ते दि. ०१ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत फलटण तालुक्यात तीव्र लॉक डाऊनचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. २४ मे २०२१ पासून पुढील ७ दिवस लॅाक डाऊनची अंमलबजावणी अतिशय कडक पद्धतीने करावयाची असल्याचे नमूद करीत या कालावधीत रस्त्यावर भाजी, फळे विक्रेते दिसणार नाहीत, दुकाने उघडी दिसणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिले असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
दि. २४ ते ०१ जून अखेर लावण्यात येत असलेल्या कडक लॉक डाऊन मध्ये किराणा / भाजीपाला दुकाने पूर्णत: बंद, राहतील अगदी घरपोहोच पार्सल सेवा बंद राहणार आहे. रस्त्यावर भाजीपाला/फळे विक्री करताना आढळल्यास संबंधीतांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करतानाच बॅंका मधील लोकांसाठीचे व्यवहार पूर्णत: बंद राहतील, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. दारु विक्री पूर्णत: बंद राहणार असल्याचे किंबहुना तालुक्यातील संपूर्ण व्यापार व्यवहार बंद राहणार असून कोणीही नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोना साखळी तोडण्याच्या या योजनेत सक्रिय सहभागी होऊन कोरोना नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात सहभागी व्हावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवजीराव जगताप यांनी केले आहे.
हॅाटेल्स व त्यामधील पार्सल सेवा,कृषी उपयोगी साहित्याची दुकानेही बंद राहतील मात्र घरपोहोच सेवा देता येईल, पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल द्यावे असे स्पष्ट निर्देश प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी दिले आहेत.