दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि. २४ : केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वाई शहरातील सर्वच व्यापारी संघटनांनी सहकार्याची भूमिका घेत स्वतःहून बंद पाळून प्रशासनाला साथ देत करोना साखळी तोडण्यासाठी योग्य भूमिका निभावली आहे. परंतु, काही व्यापाऱ्यांचे नाशवंत वस्तू विक्री करण्याचे व्यवसाय आहेत.

त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासह शहरातील छोट्या- मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाई शहरातील व्यापारी संघटनेचे सर्व सदस्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमात राहून आपले व्यवसाय करण्यास तयार असून त्यासाठी त्वरित परवानगी मिळावी अन्यथा वाई शहरातील सर्व व्यापारी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, अशा आशयाचे लेखी निवेदन पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांना देण्यात आले आहे.

निवेदनात असेही म्हटले आहे, सर्व व्यापारी वेगवेगळे व्यवसाय करीत असले तरीही प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करू, सम- विषम तारखांना दुकाने उघडे ठेवण्यास तयार असून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात येईल, व्यवसाय करताना सॅनिटायझर व मास्कचा वापर योग्य पद्धतीने करू.

वाई शहरातील व्यावसायिकांचे दररोज होणारे नुकसान परवडणारे नाही. कारण दुकानाचे भाडे, वीज बिल, नोकर पगार, बॅंकेकडून घेतलेल्या कर्जांचे व्याज व हप्ते, सर्व प्रकारचे शासकीय कर भरावे लागणार असून याचा पालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा वाई सर्व व्यापारी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

किराणा दुकाने असोशिएशन, मेडिकल्स असोशिएशन, वाईन शॉप असोशिएशन, कापड व्यवसाय संघटना, हॉटेल व स्वीट होम व्यावसायिक, हार्डवेअर असोशिएशन, मोबाईल शॉप्स असोशिएशन, फळे व भाजी विक्रेते, दूध डेअरी व बेकरी असोशिएशन यांच्यासह वाई शहरातील 22 व्यापारी संघटनांच्या निवेदनावर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!