दैनिक स्थैर्य । दि. 14 सप्टेंबर 2021 । फलटण । गत दोन दिवसांपूर्वी कोळकी (ता.फलटण) येथे घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यामुळे संबंधित कुटूंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोळकी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून या ठिकाणी मंजूर असलेले पोलीस चौकी लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. सदर पोलीस चौकीकरिता कोळकी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन देणे आवश्यक असून तसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.
सदर प्रसिद्धीपत्रकात शिंदे यांनी नमूद केले आहे की, कोळकी ही फलटण शहरा लगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विद्यमान गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीवरून या ठिकाणी पोलीस चौकी मंजुर केले होती. गावातील जेष्ठ नागरिक, पत्रकार या सर्वांना बरोबर घेऊन सातत्याने कोळकीत पोलीस चौकी व्हावी यासाठी मी प्रयत्न केले व पोलीस चौकी मंजूर करुन घेतली. तद्नंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या हस्ते कोळकीत ग्रामपंचायतीने उपलब्ध करुन दिलेल्या गाळ्यांमध्ये पोलीस चौकीचे उद्घाटन झाले मात्र पोलीस चौकीसाठी स्वतंत्र जागेची मागणी संबंधित प्रशासनाकडून ग्रामपंचायतीकडे करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाच्या शेजारी जागा देतो असे संबंधित अधिकार्यांना सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून पोलीस चौकीसाठी निधी उपलब्ध करून आणला परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे हा निधी उपयोगात आला नाही. कोळकी गावामध्ये हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने बाहेरुन लोकांची वर्दळ असते. या ठिकाणी सातत्याने चोर्यामार्या, भांडणे होत असतात. या सगळ्या गोष्टींकडे ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जर कोळकी ग्रामपंचायतीने पोलीस चौकीकरिता शासनास जागा उपलब्ध करून न दिल्यास ग्रामस्थांसाठी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, जयकुमार शिंदे यांनी नमूद केले आहे.