स्थैर्य, सातारा, दि.२६: अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने १८ टक्के बोनस देऊन कामगार, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना १ लाख तर ऊस तोडणी मजुरांसाठी ५० हजारांचा कोरोना विमा उतरवून सर्वांनाच सुरक्षा कवच दिले आहे.
कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कामगारांना बोनस जाहिर करतानाच अधिकारी व कामगार कर्मचाऱ्यांना कोरोना आजारासाठी १ लाख रुपयांचा विमा देणार असल्याचे जाहिर केले. तसेच कारखान्याकडे ऊसतोड करण्याकरीता येणा-या ऊसतोड कामगारांसाठी ५० हजार रुपयांचा कोरोना विमा देणार असल्याचे जाहीर केले आणि कोरोना महामारीत या सर्वांच्याच सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. तसेच ऊसतोड कामगारास कोरोना संसर्ग झाल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी मंगलमुर्ती हॉस्पिटल यांचेशी करार केला असून उपचारासाठी पुष्कर हॉल येथील ८२ बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय ऊसतोड कामगारांची कारखान्यातर्फे वेळोवेळी वैद्यकिय तपासणीही केली जाणार आहे. तसेच त्यांना साबण, मास्क यांचेही वेळोवेळी वाटप करण्यात येणार असल्याचे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत, व्हा.चेअरमन विश्वास रामचंद्र शेडगे, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्यासह सर्व संचालक, सर्व अधिकारी व कामगार- कर्मचारी उपस्थित होते.