
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : फलटण तालुक्यातील होलार समाजातील वाद्य कलावंतांनी शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने’चा लाभ घ्यावा, असे आवाहन नारायण आवटे, महेंद्र गोरे आणि राहुल करे यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली असून, पात्र कलावंतांनी त्वरित अर्ज सादर करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
ज्या कलावंतांचे वय ५० वर्षे पूर्ण आहे, दिव्यांगांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे, आणि ज्यांची उपजिविका कलेवरच अवलंबून आहे, ते या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी कलाकाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि त्यांचे कला क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असावे, असे निकष आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कलाकारांनी https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी केले आहे. अर्जासोबत वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि आपल्या कलेचे पुरावे जोडणे आवश्यक आहे.
तालुक्यातील ज्या पात्र वाद्य कलावंतांचे अर्ज भरायचे राहिले असतील, त्यांनी मुदतीत अर्ज करावेत. काही अडचण आल्यास संपर्क साधावा, असे नारायण आवटे यांनी म्हटले आहे.