स्थैर्य, चंद्रपूर, दि. १७: कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता 75 आयसीयु बेड तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. त्या अनुषंगाने स्त्री रुग्णालय येथे लहान मुलांसाठी वेगळा व स्वतंत्र ऑक्सीजन युक्त व आयसीयु बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी जिल्हास्तरावर पेडियाट्रिक टास्क फोर्स स्थापित करण्यात आली असून सदर टास्क फोर्स मार्फत तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने एसओपी, ट्रीटमेंट प्रोटोकॉल, लहान मुलांच्या उपचारासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयात सुद्धा कोविड पेडियाट्रिक (बालरुग्ण) रुग्णांकरिता उपचाराची सोय उपलब्ध करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील एकूण तीन रूग्णालयाला कोविड पेडियाट्रिक रुग्णांच्या उपचाराकरिता स्वतंत्र मान्यता देण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयामध्ये अक्सिजन युक्त बेड,आयसीयू, व्हेंटिलेटर, सुसज्ज ठेवण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
तसेच कोविड पेडियाट्रिक (बालरुग्ण) रुग्णांच्या व्यवस्थापनाकरिता लागणारे सर्व साहित्य, औषध साठा, सामुग्री जसे की न्युवोनेटल वेंटीलेटर, सीपॅप उपलब्ध करून घेण्याबाबतचे निर्देशही दिले.
आपल्यापासून लहान मुलांना संसर्ग होणार नाही यासाठी पालकांनी विशेष काळजी व दक्षता घ्यावी. तसेच मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये शक्यतो लहान मुलांना बाहेर नेऊ नये. लक्षणे आढळल्यास त्वरित बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.