
स्थैर्य, मुंबई, दि.१९: राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. दरम्यान विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करून निकाल लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मुदतवाढ मिळाली आहे. त्यानंतर आता परीक्षेच्या कामकाजासाठी विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी यापुढे १०० टक्के उपस्थिती लावणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे.
परीक्षांच्या कार्यपद्धतीत प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन अशा अनेक कामांचा समावेश होत असतो. अंतिम वर्षाच्या परीक्षा १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत घेऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर करणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले.
बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, रजिस्टार यांच्यासह आमदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत नाराजी व्यक्त केली. तर, एम. के. संघवी, आरकेटी -उल्हासनगर, आदर्श महाविद्यालय बदलापूर, केबीपी महाविद्यालय वाशी आदी ठिकाणी शिक्षकांना संसर्ग झाल्याची माहिती सचिव मधू परांजपे यांनी दिली.