दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । सातारा । गाळपासाठी येणाऱ्या ऊसाचे १० दिवसांत पेमेंट देणारा कारखाना अशी ख्याती मिळवलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने ऊस पुरवठादार सभासद, शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही गोड केली आहे. गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १४१ रुपयेप्रमाणे शेवटच्या हप्त्याची सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँकखाती वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली असून १८ टक्केप्रमाणे बोनसपोटी ३ कोटी २९ लाख ५६ हजार रुपये कारखान्यातील कामगारांच्या बँक खात्यावर जमा करून त्यांचाही दिवाळसण दरवर्षीप्रमाणे गोड केला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अजिंक्यतारा कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम झाला असून गाळप झालेल्या उसाची एफआरपीप्रमाणे संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची परंपरा कारखान्याने सातत्याने जोपसली आहे. काटकसरीचे धोरण आणि काटेकोर नियोजन याद्वारे कारखान्याची प्रगती साध्य झाली असून संस्थेने अनोखा नावलौकिक प्रस्थापित केल्याने अजिंक्यतारा कारखाना सहकार क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. मागील गळीत हंगामात उच्चांकी गाळपाचा विक्रम करून कारखान्याने एफआरपीनुसार प्रतिटन २९४१ रुपये दर दिला आहे. त्यातील २६०० रुपयांचा पहिला हप्ता १० दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यात आला. त्यानंतर २०० रुपयांचा दुसरा हप्ताही वेळेत देण्यात आला होता. आता दिवाळीपूर्वीच १४१ रुपये प्रतिटन तिसरा आणि शेवटचा हप्ता याप्रमाणे १२ कोटी २७ लाख ३७ हजार ८७८ रुपये एवढी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून कारखान्याने एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम अदा केली आहे. दिवाळीच्या तोंडावर तिसरा हप्ता दिल्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.
सभासद शेतकऱ्यांप्रमाणेच कारखान्यातील कामगार हा संस्थेचा कणा आहे. कारखाना अडचणीच्या काळात असताना पगाराची अपेक्षा न धरता कामगारांनी कष्ट उपसले, घाम गाळला आणि म्हणूनच अजिंक्यतारा कारखाना आज नावारूपास आला आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे. दिवाळीनिमित्त कामगारांना बोनस देण्याची परंपरा कारखान्याने सातत्याने जपली आहे. यंदाही कामगारांना १८ टक्के बोनस देण्यात आला असून त्यापोटी ३ कोटी २९ लाख ५६ हजार रुपये एवढी रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही कामगारांची दिवाळी गोड झाली आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहील, अजिंक्यतारा कारखाना सभासद- शेतकरी हिताशी कधीही तडजोड करणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने दिला आहे.