दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । सातारा । गड, किल्ले, वाडे हे आपल्या उज्ज्वल आणि जाज्वल्य इतिहासाची प्रतीके असून आपल्या इतिहासाचा हा ठेवा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेऊन तो जतन करावा आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करावा, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यातील मेणवली येथील नानासाहेब फडणवीस वाड्यच्या जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्याचे आणि स्मार्ट ऑडी ऑडीओ गाईडचे उद्घाटन गुढी पाडव्याच्या महुर्तावर साता-याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नानासाहेब फडणवीस यांचे वंशज अनिरूद्ध मेणवलीकर, नितीन मेणवलीकर, संदीप मेणवलीकर आणि इतर मेणवलीकर फडणीस कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना पांडुरंग बलकवडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये ऐतिहासीक पाऊलखुणा तुलनेने कमी असूनही पर्यटनाच्या माध्यमातून त्यांचे निधीसंकलन आणि त्यांचे उत्पन्न महाराष्ट्रा पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही इतिहास जीवंत आहे. त्या जीवंत इतिहासा पर्यंत पुणे, मुंबईसह जगभरातील पर्यटकांना आकर्षित करून तिकडे वळवता आले पाहिजे. याव्दारे इतिहासा्च्या जतना बरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन स्थानिक तरूणांच्या हाताला काम मिळेल. वारश्याच्या जतनासाठी सरकार काही करेल, याची वाट न पाहता ज्या वंशजांना शक्य आहे, त्यांनी पुढाकार घेऊन वारश्याचे जतन करून आपल्या इतिहासाच्या वैभवात भर घालावी. नाना फडणवीसांचे इतिहासातील स्थान अढळ असून इंग्रजांची राजवट थोपवून ठेवण्यात नाना फडणवीसांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. माधवराव पेशवे यांच्या तालमीत तयार झालेले नाना फडणवीस हे इतिहासाचे सुवर्ण पान असून ‘जबतक नाना, तबतक पूना’ अशी ख्याती नानासाहेबांनी मिळवली होती. मेणवलीकर फडणीस कुटुंबियांनी घेतलेल्या पुढाकारातून आगामी अडीचशे वर्षे हा इतिहास तरूण पिढीपर्यंत पोहोचवला जाईल, याचा एक इतिहास अभ्यासक म्हणून मनस्वी आनंद होतो.
यावेळी बोलताना साता-याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग म्हणाले की, सौंदर्यदृष्टी ठेवून या वाड्याच्या जिर्णोद्धाराचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. ऐतिहासीक ठेव्यांच्या जिर्णोद्धारबाबत सर्व पातळ्यांवर असलेली अनास्था खेदजनक असून जिर्णोद्धाराच्या कामाकडे गांभीर्याने पाहणे, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. राजस्थान सरकारने त्यांची वारसास्थळे जतन करण्यासाठी अवलंबलेली धोरणे ही आदर्श असून ती धोरणे महाराष्ट्रातील वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी प्रारूप म्हणून अंमलात आणली पाहिजे.वाईच्या परिसराला असलेले घाट, औंध संस्थान या माध्यमातून समृद्ध वारसा मिळालेला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे येणा-या पर्यटकांना वाईमधील या समृद्ध घाटांपर्यंत आणि संस्थांनांपर्यंत आणण्यासाठी अशा स्मार्ट ऑडिओ गाई़डसारख्या उपक्रमांची आवश्यकता आहे. या सगळ्या वारसा स्थळांमध्ये इतिहासाचे धागेदोरे दडलेले असून मराठी संस्कृती, खाद्य संस्कृती, लोककला, इतिहास या सगळ्यांशी पुढील पिढी जोडली जाणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना अनिरूद्ध मेणवलीकर फडणीस म्हणाले की, स्मार्ट आॅडिओ गाईड ही संकल्पना भारतात नवीन असली तरी पाश्चात्य देशात पर्यटन करतांना ती सहज स्वीकारली गेलेली संकल्पना आहे. जणू काही वाडाच पर्यटकांशी संवाद साधत वाड्याचे गतवैभव आणि इतिहासाच्या पाऊलखुणा, इतिहासाची पाने उलगडून दाखविणार आहे. स्मार्ट आॅडिओ गाईडच्या माध्यामातून पर्यटक आणि वाडा यांच्यात अनोखे ऋणानुबंध प्रस्थापित होणार असून जाज्वल्य इतिहासाशी तरूण पर्यटकांची नाळ जोडली जाणार आहे. हे स्मार्ट आॅडिओ गाईड वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील पर्यटकांसाठी खास नवीन आकर्षण ठरणर आहे. नव्या पिढीला भावणा-या आणि अनेक खास वैशिष्ट्ये असलेल्या या स्मार्ट आॅडिओ गाईडच्या माध्यमातून वारसा पर्यटनाचा खास अनुभव मिळणार आहे.
यावेळी बोलताना नितीन मेणवलीकर फडणीस म्हणाले की, पेशवाईचा इतिहास लाभलेला मेणवली येथील नाना फडणवीस वाडा आणि घाट हा पाचगणी -महाबळेश्वर रस्त्यावरील वाई पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. 250 वर्षांपूर्वीच्या वाड्याचे हे वैभव अजून पुढे किमान 250 वर्षे तरी अबाधित रहावे, या हेतूने वाड्याच्या जीर्णोद्धाराचे ( रिस्टोरेशन) कार्य हाती घेतले आहे. याची मुहूर्तमेढ घाटावरील मेणेश्वर मंदिरात नानांनी त्याकाळी सुरू केलेल्या महाशिवरात्र उत्सवाला पुनरुज्जीवित करून सुमारे पंधरा वर्षांपूर्वी रोवली गेली. हा आमचा वाडा म्हणजे स्थापत्यशास्त्र, पेशवे कालीन भित्तिचित्रे, थोर इतिहास आणि मोडी लिपी दफ्तर यांचा एकत्रित असा उत्तम नमुना आहे. या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या वास्तूची उत्तम रीतीने, मूळ स्वरूपाला कुठेही धक्का न लावता जपणूक व्हावी, या आमच्या प्रबळ इच्छेतूनच आम्ही वाड्याच्या जीर्णोद्धाराचे काम तीन टप्प्यात करण्याचे योजले आहे .या कार्याचा योजलेला पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. या आमच्या कार्यात आम्हाला इतिहास प्रेमी आणि या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभत आहे. पर्यटक वाड्याला भेट देऊन वाडा पाहू शकतात. वाड्याचा दिंडी दरवाजा, नगारखाना, बुरुज, गणेश चौक, दगडी कारंज, हळदी कुंकू चौक, मेणवली दफ्तर, लाकडी कोरीवकाम ही वाड्याची प्रमुख आकर्षणे पेशवाईच्या समृद्ध काळाची आठवण करून देणारी आहेत.
यावेळी हे स्मार्ट ऑडिओ गाईड विकसीत करण्यात मोलाची बजावणारे सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नितीन मेणवलीकर यांनी स्मार्ट ऑडिओ गाईड विकसीत करण्यामागची भूमिका विशद केली. अनिरूद्ध मेणवलीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. संदिप मेणवलीकर यांनी आभार मानले. ऋजुता सरोदे यांच्या पसायदान सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.