
स्थैर्य, सातारा, दि. 7 ऑगस्ट : वेणुग्राम गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचार्यांसाठी एक चांगली संधी आहे, ज्यामुळे त्यांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल, अशा विश्वास मदत व पुनवर्वसन मंत्री मकरदं पाटील यांनी व्यक्त केला.सातारा येथील लॅन्डमार्क या नवीन गृह प्रकल्पाची मदत व पुनवर्वसन मंत्री मकरदं पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेश पाटील – वाठारकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज देशमुख, मराठा बिझनेस फोरमचे जगदीश शिर्के, बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक विमलाकर, कारंडे व्यवस्थापक जयवंत पवार, वेणुग्राम गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, सचिव राहुल डेरे व बँकेचे सेवक उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी (कै.) वेणूताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचार्यांनी कर्मचार्यांसाठी एकत्र येऊन वेनुग्राम गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. सातार्यामध्ये स्टँड समोर मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा खरेदी करून ती जागा कांग्राळकर इंफ्रास्ट्रक्चर यांच्या माध्यमातून विकसित केली जात आहे. यामध्ये 280 कर्मचार्यांसाठी 1013 चौ. फुटाचे 280 फ्लॅट बँकेच्या सेवकांसाठी बांधकाम सर्व सोयी सुविधांसह उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मकरंद पाटील म्हणाले, वेनुग्राम गृहनिर्माणसंस्थेची स्थापना बँकेच्या कर्मचार्यांसाठी कमी दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश बँकेच्या कर्मचार्यांना परवडणार्या दरात घरे उपलब्ध करून देणे हा आहे. हा प्रकल्प सातार्याच्या वैभवात भर घालणारा असून यामध्ये उभारणारे लँडमार्क बिझनेस पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. या इमारतींमधील सॅम्पल फ्लॅटचे उद्घाटन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते झाले.