दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । सातारा । सातारा केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केलेल्या मागणीला व पुढे त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी जागेचा शोध सुरू असून पर्यायी जागांची पहाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली. लोकसभा निवडणूकीनंतर खासदार म्हणून गोपनीयतेची शपथ घेताच पहिल्याच अधिवेशनात खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय विद्यालयाची मागणी लोकसभेत केली होती. सातारा जिल्ह्यामधील सैन्य आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्यांची संख्या पूर्वीपासून मोठी आहे. त्यांच्या पाल्यासह जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांच्या मुलांसाठी सोयीचे ठरणारे केंद्रीय विद्यालय सातारा जिल्ह्यात नसल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा अपूर्ण राहते. देशसेवेत सातारा जिल्ह्यातील असंख्य सैनिक आहेत. तसेच देशसेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या सैनिकांची संख्याही मोठी आहे असे सांगून सेवेत बदली होत असल्यामुळे अथवा सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पाल्याचा अभ्यासक्रम व शिक्षणात खंड पडत असतो. त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये त्यासाठी केंद्रीय विद्यालयाची सोय व्हावी याकरिता शासनाने सातारा जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय उभारावे अशी आग्रही मागणी त्यांनी त्यावेळी केली होती. तर यासंदर्भात वेळोवेळी संसदेमध्ये आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्याकडे ते गत दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाची शिफारस घेऊन परिपूर्ण प्रस्ताव केंद्र शासनाकडे जाणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी सातारा, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या कार्यालयाकडे त्यांनी नियमित पाठपुरावा सुरू ठेवला आहे. हा परिपूर्ण प्रस्ताव तयार करत असताना त्यात केंद्रीय विद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा सुनिश्चित करण्यासाठी सातारा तालुक्यातील सातारा शहरापासून सोयीस्कर अंतरावर असलेल्या दोन-तीन पर्याय जागांची प्रत्यक्ष पहाणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी थोरवे, साता-याच्या तहसीलदार आशा होळकर यांची उपस्थिती होती.
सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व शैक्षणिक वैभवात भर टाकणा-या केंद्रीय विद्यालयासाठी प्रथमपासूनच प्रयत्नशील आहे. याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे पोहच करून पुढील पाठपुरावा करण्यात येईल. केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी कटिबद्ध असून त्यासाठी गती मिळाल्याचा आनंद आहे.- खा.श्रीनिवास पाटील.